नवी मुंबई: जन्मदिवस साजरा करण्यासाठी लॉजवर आलेल्या तरुणाने प्रियसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर प्रियकर पळून जात असताना तो साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी लॉजवर जाऊन पाहणी केली असता हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. खैरणे एमआयडीसी मधील अश्विन लॉजमध्ये सोमवारी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सोहेब कलाम शेख (२४) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहेब हा साकीनाक्याचा राहणारा असून तो अमित कौर रणधीर सिंग वीग (३५) नावाच्या महिलेसोबत लॉजवर आला होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असे शेख याने पोलिसांना सांगितले आहे.
तर मृत अमित कौर ह्या मुंबईतील एका बँकेत मॅनेजर असून घटस्फोटीत आहेत अशी माहिती समोर येत आहे. रविवारी अमित कौर यांचा जन्मदिवस होता. तो साजरा करण्यासाठी सोमवारी दोघेही अश्विन लॉजवर आले होते. त्यानुसार रात्री दोघांनी एकत्र केक देखील कापला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असता, सोहेब याने गळा आवळून अमित कौर यांची हत्या केली. तर, मृतदेह त्याच खोलीत घेऊन रात्रीच्या वेळी त्याने लॉजमधून पळ काढला. दरम्यन लॉजमधील कामगारांना त्याची कसलीही कल्पना नव्हती. परंतु सोहेब हा हत्या करून राज्याबाहेर पळून जात असल्याची माहिती साकीनाक्याचे सहायक निरीक्षक वाल्मिक कोरे यांना मिळाली असता त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. चौकशीत सोहेब याने हत्येची कबुली देताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्याद्वारे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अमित कौर यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी त्याला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच हत्येचे नेमके कारण काय याचाही पोलिस अधिक तपास करत आहेत.