सीबीएसई दहावीच्या निकालात मुलींची बाजी, दोन विद्यार्थिनींना मिळाले ९९ टक्के गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:26 AM2019-05-07T02:26:25+5:302019-05-07T02:26:52+5:30
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात दोन विद्यार्थिनींनी ९९ टक्के गुण मिळवले आहेत, तर अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
नवी मुंबई : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात दोन विद्यार्थिनींनी ९९ टक्के गुण मिळवले आहेत, तर अनेक शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कोणत्याही प्रकारे अभ्यासाचा ताण न घेता केवळ अभ्यासात सातत्य राखून हे यश मिळवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
सोमवारी लागलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या निकालात कोपरखैरणेतील रिलायन्स फाउंडेशन स्कूलच्या धात्री मेहता व नेरुळच्या एपीजे स्कूलच्या दीपसमा पांडा या दोघींनी ९९ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांना ५०० पैकी ४९७ गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दीपसमा पांडा हिने अभ्यासाकरिता स्वत:चे वेळापत्रक तयार केले होते. त्यानुसार स्वत:चे इतर छंद जोपासत वेळापत्रकानुसार नियमित ती अभ्यास करायची. तर धात्री मेहता हिने कोणताही खासगी क्लास न लावता ९९ टक्के गुण मिळवले आहेत.
नियमित घरीच अभ्यास करण्यासह सराव पत्रिका सोडवणे यावर ती भर द्यायची. अभ्यासात एकाग्रता लागावी यासाठी ती मेडिटेशन देखील करायची. त्यामुळे आपल्याला तणावमुक्त अभ्यासाला मदत झाली असून, इतर विद्यार्थ्यांनीही ताण न घेता अभ्यास करण्याचा सल्ला दोघींनीही दिला आहे. त्याचप्रमाणे नेरुळच्या एमजीएम शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये प्रिया मडके हिला ९७ टक्के, नक्षत्रा तरडे हिला ९६ टक्के, प्रसाद इथापे याला ९५ टक्के, अनिता मौर्या हिला ९४ टक्के, श्रीराज घाडगेला ९२ टक्के, तरुन्नम फाकराला ९२ तर पलक तिवारीला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांसह पालकांकडून कौतुक केले.