पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे भाड्याच्या खोल्यांमध्ये सुरू असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे खांदा वसाहतीतील हक्काच्या इमारतीत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणीदेखील विद्यार्थिनींचे प्रश्न संपलेले दिसत नाहीत. त्यांना पाण्यासाठी सिडकोकडे तर इंटरनेटसाठी एमटीएनएलकडे पाठपुरावा करावा लागत आहे.पनवेल तालुक्यात एकमेव असलेले आदिवासी मुलींचे वसतिगृह खांदा वसाहतीतील नवीन व हक्काच्या इमारतीत काही दिवसांपूर्वी स्थलांतरित झाले आहे. शिक्षणासाठी अनेक मुली पनवेल शहरात दाखल होत असतात. मात्र, राहण्याची सोय नसल्याने मिळेल त्या ठिकाणी बिºहाड टाकले जाते. शहरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आकुर्ली गावात असणाºया खोल्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थिनींची तात्पुरती सोय करण्यात आली होती. शाळेपासून हे वसतिगृह लांब असल्याने बहुतांशी मुली रोज सकाळी चालत शाळा गाठत होत्या.आकुर्ली मालेवाडी येथील भाड्याच्या सात रूममध्ये कार्यालय, स्टोअर रूमसह ७६ मुलींना दाटीवाटीने राहावे लागत असे. २००७पासून भाड्याने जागेत सुरू असलेल्या वसतिगृहाला तब्बल १० वर्षांनी हक्काची जागा मिळाली आहे. ३ कोटी ५२ लाख खर्च करून ३ माळ्यांची इमारत बांधून देण्यात आलेली आहे. मात्र, सद्यस्थितीत बोअरवेलचे पाणी विद्यार्थिनी वापरत आहेत. सिडकोकडून पाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही, तर पूर्वी आकुर्ली येथे बीएसएनएलचे नेट वापरत होते. नवीन इमारतीत नेटची सुविधा नसल्याने कामाचा खोळंबा होत आहे. २०११मध्ये पनवेलच्या आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचे तत्कालीन गृहपाल विजय मोरे यांनी प्रयत्न करून सिडकोकडून खांदा वसाहतीत मुलींच्या वसतिगृहासाठी भूखंड मिळवला होता.वसतिगृहात ३३ खोल्या असून, १ कॉमन रूम, १ संगणक रूम, १ अभ्यास रूम असून २९ रूम मुलींसाठी आहेत. या आदिवासी वसतिगृहात ७६ मुली राहत असून ११ वी, १२ वी, नर्सिंग, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. पाण्याचा पुरवठ्याबाबत सिडकोचे राहुल सरोदे यांना विचारले पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.नवीन इमारतीत स्थलांतरित झाल्याने आनंद झाला आहे. आमच्या हक्काची इमारत मिळाली आहे. भाड्याच्या खोल्यांमध्ये झोपायला बेड देखील नव्हते. दाटीवाटीने राहावे लागत असे.- जयश्री गुट्टे,विद्यार्थिनीनवीन इमारतीत राहायला आल्याने कॉलेजला लवकर जायला मिळते. पूर्वीच्या भाड्याच्या खोल्यांमध्ये राहत असताना खूप लांब चालत जावे लागत असे. या ठिकाणी मोकळेपणाने राहत आहोत. या ठिकाणी सिडकोने पाणीपुरवठा करून द्यायला हवा.- राणी उघडे,विद्यार्थिनी
मुलींना मिळाले हक्काचे वसतिगृह, खांदा वसाहतीत आदिवासी मुलींसाठी उभारली इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 3:29 AM