सिडकोच्या इमारतींना अडीच चटईक्षेत्र द्या, संघर्ष समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:32 AM2017-09-29T03:32:02+5:302017-09-29T03:32:05+5:30
सिडकोने प्रारंभीच्या काळात बांधलेल्या व आता जीर्ण झाल्याने पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहसंकुलांना २.५ चटईक्षेत्र सिडकोने मंजूर केलेले आहे.
पनवेल : सिडकोने प्रारंभीच्या काळात बांधलेल्या व आता जीर्ण झाल्याने पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहसंकुलांना २.५ चटईक्षेत्र सिडकोने मंजूर केलेले आहे; परंतु त्याची सिडकोच्या काही अधिकाºयांकडून अंमलबजावणी होत नसल्याने अडीच चटईक्षेत्र लागू करण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीने केली आहे.
नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली परिसरात सिडकोने बैठ्या चाळी व तीन मजली इमारती बांधून त्या विकल्या होत्या. त्यानंतर पुलाखालून खूप पाणी निघून गेले आहे. २५ ते ३० वर्षांनंतर त्या बैठ्या चाळी अनेकदा पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. त्याशिवाय इमारतींनाही पुराचा फटका आणि निसर्गाच्या लहरीपणाचा तडाखा बसल्याने त्या पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने सिडकोच्या त्या इमारतींसाठी २.५ वाढीव चटईक्षेत्र देण्याचे मान्य करत अध्यादेश जारी केला आहे; परंतु तरीही महाराष्ट्र शासन आणि सिडकोच्या काही झारीतील शुक्राचार्यांनी त्या चटईक्षेत्राची अंमलबजावणी करण्यास मज्जाव केल्याने अनेक इमारतीतील रहिवाशांची कुचंबणा झाली आहे. सिडकोची संबंधित वसाहत कार्यालये आणि सीबीडी-बेलापूर येथील मुख्य कार्यालयात खेटा घालूनही त्यांना न्याय मिळत नाही. याबाबतीत संघर्ष समितीने सिडकोला धारेवर धरले आहे. राज्य शासनाने जर सिडकोच्या इमारतींना अडीच चटईक्षेत्र देण्याचे मान्य करून अध्यादेश जारी केला असेल तर त्याची त्वरित अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी सिडकोविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दिला आहे.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिडकोचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार रमेश डेंगळे आणि वरिष्ठ नियोजनकर रवींद्र मानकर यांनी त्या इमारतींना अडीच चटईक्षेत्र मंजूर करण्यात आलेले आहे. त्यासंबंधी सिडकोकडे प्रस्ताव आल्यास ते मंजूर करण्यात येतील. त्यासंबंधी काही अडचणी आल्यास आमच्याशी संपर्क साधा, असे सांगितले. संघर्ष समितीच्या नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत उपाध्यक्ष विजय काळे यांनी सिडकोने पूर्वी बांधलेल्या व सद्य:स्थितीत शेवटच्या घटका मोजत असलेल्या इमारतींच्याबाबतीत मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करून सिडको अधिकाºयांची भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष विजय काळे, चंद्रकांत शिर्के , मंगल भारवाड, मनोहर देसाई, रामाश्री पटेल आदींनी डेंगळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.