भार्इंदर : पालिकेने खरेदी केलेल्या नवीन १०० बसेस चालविण्याचा ठेका मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला पुन्हा द्यावा, अशी मागणी कंपनीच्या संचालकांनी प्रशासनाकडे केली आहे.पालिकेने खाजगी-लोकसहभाग तत्त्वावर २०१० मध्ये सुरू केलेल्या रॉयल्टीच्या माध्यमातून उत्पन्न देणाऱ्या स्थानिक परिवहन सेवेचा ठेका उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंपनीला दिला आहे. पूर्वीच्या कंत्राटातील ५२ व केंद्राच्या तत्कालीन जेएनएनयूआरएम योजनेतून पहिल्या टप्प्यातील ५० अशा एकूण १०२ बसेस ठेकेदाराला परिवहन सेवा चालविण्यास दिल्या होत्या. त्यातील अनेक बसेस नादुरुस्त झाल्याने ठेकेदाराने त्यातील ४६ बसेस २०१२ मध्ये तर सप्टेंबर २०१५ मध्ये ६ बसेस कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी भंगारात विकल्या आहेत. उर्वरित ५० बसेस योग्य देखभाल-दुरुस्तीअभावी नादुरुस्त झाल्या आहेत. पालिकेने करारानुसार परिवहन सेवेला आगारासारख्या अत्यावश्यक सुविधा न दिल्यानेच बसची भंगारावस्था झाल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे. ठेकेदाराने पालिकेला देय असलेली सुमारे ७५ लाखांची रॉयल्टी थकविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, तर पालिकेने ठेकेदाराला विविध सवलतींच्या माध्यमातून सुमारे ४० कोटींची रक्कम देणे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या बसची संख्या १८ च राहिल्याने परिवहन विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रवाशांत प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यावर, प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात खरेदी केलेल्या १०० पैकी २५ बसेस तातडीने मागवून त्यातील ६ बसेस सध्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
नवीन १०० बसेस चालविण्याचा ठेका द्या
By admin | Published: November 12, 2015 1:38 AM