मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ द्या; लोकप्रतिनिधींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:15 AM2020-10-04T00:15:53+5:302020-10-04T00:15:57+5:30
कर भरणा केंद्र वाढविण्याचीही सूचना
नवी मुंबई : महानगरपालिकेने नागरिकांना मालमत्ता कराची बिले पाठविली असून, त्याचा भरणा करण्यासाठी कमी मुदत दिली आहे. कोरोनामुळे शहरवासीयांची आर्थिक घडी विस्कटली असून, कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी केली आहे.
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले आहे. नागरिकांना २२ सप्टेंबरपासून बिले वितरित होऊ लागली असून, ती भरण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर अनेकांची आर्थिक समीकरणे बिघडली आहेत. अशा स्थितीमध्ये तत्काळ कर भरणा करणे शहरातील अनेक नागरिकांना शक्य नाही. याशिवाय शहरातील विभागनिहाय बिलभरणा केंद्रही बंद आहेत. नागरिकांना बिल भरण्यासाठी पुरेशी केंद्रे उपलब्ध नाहीत. यामुळे विभाग कार्यालयात जाऊन सर्वांना बिल भरणे शक्य होत नाही, याशिवाय रांगेत उभे राहावे लागल्यामुळे कोरोना होण्याची भीती वाटत आहे. सर्वच नागरिकांना आॅनलाइन पद्धतीने बिले भरता येत नाहीत व सोसायटीला तांत्रिक अडचणींमुळे ते शक्यही नसते.
पालिकेने कर भरण्यासाठी सर्वांना मुदत वाढवून द्यावी. विलंब शुल्क आकारू नये, अशी मागणी केली आहे. याशिवाय विविध ठिकाणी केंद्रे सुरू करावी, असेही सुचविले आहे.