नवी मुंबई : सीबीडीमधील अपोलो रुग्णालयामध्ये प्रकल्पग्रस्त व स्थानिक तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांवर सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली आहे. रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसच्यावतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. प्रकल्पग्रस्तांची १०० टक्के जमीन संपादन करून नवी मुंबई वसविण्यात आली आहे. सिडको व एमआयडीसी क्षेत्रातील व्यवसायांमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देणे कायद्याने बंधनकारक आहे. अपोलो रुग्णालयामध्ये देखभाल दुरुस्ती, साफसफाई व इतर कामे स्थानिकांना देण्यात यावी. कुशल व अकुशल नोकरभरतीत रहिवाशांना प्राधान्य द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये १२०० बेडचे अपोलो हे एकमेव रुग्णालय आहे. सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचाराची सोय असावी अशी मागणीही काँगे्रसच्या शिष्टमंडळाने केली आहे. रवींद्र सावंत यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, इंटकच्यावतीने आम्ही स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. यावेळी संतोष शेट्टी, अमित पाटील व काँगे्रसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नवीन रुग्णालयामध्ये स्थानिकांना रोजगार द्या
By admin | Published: November 15, 2016 4:56 AM