एपीएमसीच्या गाळेवाटपासह कंत्राटात स्थानिकांना प्राधान्य द्या, राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:29 PM2023-12-08T16:29:05+5:302023-12-08T16:30:03+5:30
महाराष्ट्र शासनाने सिडको, एमआयडीसी आणि बाजार समितीसाठी लागणारी जमीन संपादन करतेवेळी स्थानिकांना नोकऱ्या, कंत्राटे वाटपात प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध बाजार पेठांमधील गाळेवाटप, विकास कामांची कंत्राटे, नोकरभरतीसह उपहारगृहांच्या कंत्राटात स्थानिक प्रकल्प्रगस्तांना प्राधान्य द्यावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ही मागणी अव्हेरल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी बाजार समितीच्या सदस्य सचिवांसह अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत पणनमंत्र्यांनाही धाडली आहे.
महाराष्ट्र शासनाने सिडको, एमआयडीसी आणि बाजार समितीसाठी लागणारी जमीन संपादन करतेवेळी स्थानिकांना नोकऱ्या, कंत्राटे वाटपात प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाचा बाजार समितीला विसर पडला आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरी मुंंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने नवी मुंबईतील आपल्या सर्व बाजार पेठांमध्ये करण्यात येणारी विकास कामांची कंत्राटे, गाळेवाटप आणि नोकरभरतीत स्थानिकांना प्रधान्य देऊन दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय दूर करावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली ही मागणी अव्हेरल्यास बाजार समिती प्रशासनाविराेधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी बाजार समितीचे सदस्य सचिवांसह अध्यक्षांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत पणनमंत्र्यांनाही धाडली आहे.