कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

By कमलाकर कांबळे | Published: March 7, 2024 08:13 PM2024-03-07T20:13:04+5:302024-03-07T20:13:44+5:30

दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत.

Go to Konkan and play colors! Four more special trains on Holi | कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

नवी मुंबई : होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने ९ ते २७ मार्च यादरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. यातील दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत. या गाड्यांसाठी विशेष तिकीट आकारले जाणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

कोकणात जाणाऱ्या गाड्यांची प्रतीक्षा यादीही तितकीच मोठी आहे. त्यामुळे उत्सव काळात या गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने अहमदाबाद - मडगाव जंक्शन - अहमदाबाद यादरम्यान साप्ताहिक गाडीच्या विशेष दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आणखी चार गाड्यांची भर पडली आहे. या गाड्या २० ते २९ मार्च यादरम्यान चालविल्या जाणार आहेत. उधना जंक्शन-मंगळुरू जंक्शन (०९०५७) ही विशेष गाडी २० आणि २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता उधना जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजता मंगळुरू जंक्शनवर पोहोचेल. मंगळुरू जंक्शन - उधना (०९०५८) ही गाडी २१ आणि २५ मार्च रोजी मंगळुरू जंक्शन येथून रात्री १० वाजता सुटेल, तर दुसऱ्या दिवशी रात्री ९:०५ वाजता उधना जंक्शनवर पोहोचेल.  

..साप्ताहिक दोन विशेष गाड्या
याच काळात सुरत ते करमाळी आणि करमाळी ते सुरत या दोन विशेष साप्ताहिक गाड्या चालविल्या जाणार आहेत. सुरत-करमाळी (०९१९३) ही विशेष साप्ताहिक गाडी २१ मार्च आणि २८ मार्च असे दोन दिवस सुरत स्थानकातून सायंकाळी ७:५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता ती करमाळी स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे करमाळी-सुरत (०९१९४) ही गाडी विशेष तिकीट दरासह २२ मार्च आणि २९ मार्च रोजी दुपारी २:४५ वाजता करमाळी स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी ८:४५ वाजता ती सुरतला पोहोचेल. ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्टेशनवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

Web Title: Go to Konkan and play colors! Four more special trains on Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.