अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती तसेच इतर कामे जुलैअखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करु न संबंधित रस्ते वाहतुकीसाठी सुखकर करावेत, असे आदेश जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. कंपनी या संबंधित कंत्राटदारास दिले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. तसेच रस्ता सुरक्षा परीक्षण, राज्य महामार्गावरील स्वच्छतागृहांचे नियोजन तसेच अपघातप्रसंगी रु ग्णवाहिका त्याचबरोबर जिल्ह्यात असलेल्या स्पीड ब्रेकर संदर्भातील अडीअडचणी आदीविषयी चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. गोवा राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम करणाऱ्या सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि. कंपनीचे प्रमुख बी.आर. गोरुले यांनी जुलैअखेर महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन या बैठकीत दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक यांनी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली. महामार्गावरील रुग्णवाहिका व पोलीस नियंत्रण यांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांच्या ठिकाणांची माहिती जी.पी.एस.सिस्टीमद्वारे अद्ययावत ठेवल्यास अपघात झालेल्या ठिकाणी तत्काळ रुग्णवाहिका पोहचू शकेल अशी महत्त्वपूर्ण सूचना केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, सहाय्यक जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशे -रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील खड्डे भरणे. -रस्त्याच्या बाजूस भराव टाकून (साइटपट्टी)समतोल ठेवणे. -महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जागेचे योग्य मोजमाप करु न, खांब लावणे. -पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीसाठी सुरू करणे. -पळस्पे ते पेण दरम्यान असलेल्या तयार पुलांवरु न वाहतूक सुरू करणे.
गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश
By admin | Published: July 15, 2015 10:52 PM