श्वानप्रेमासाठी गोवा ते मुंबई पदयात्रा !
By admin | Published: November 22, 2015 12:44 AM2015-11-22T00:44:52+5:302015-11-22T00:44:52+5:30
भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक
नवी मुंबई : भटक्या श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देण्यासाठी गोव्याची व्यक्ती मुंबईच्या पदयात्रेवर निघाली आहे. गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले असून, प्रवासात भेटलेले अनेक भटके श्वान त्यांनी सोबत आणले आहेत. या प्रवासात त्यांनी अनेक भटक्या जखमी श्वानांवर उपचारदेखील केले असून, काहींना सोबतच आणले आहे.
घरामध्ये कुत्रे पाळून त्याचे लाड करायला प्रत्येकालाच आवडते. परंतु रस्त्यावर एखादे भटके कुत्रे दिसल्यास त्याला दगड मारण्याची इच्छाही त्यापैकी अनेकांना होतच असते. मात्र अशा भटक्या कुत्र्यांसाठी घर सोडून त्यांच्यासोबत रस्त्यालगत पदपथावर झोपणारी एक व्यक्ती श्वानांवर प्रेम करण्याचा संदेश देत गोवा ते मुंबईच्या पदयात्रेला निघाली आहे. सुफी मोहम्मद अल्ताफ असे या श्वानप्रेमीचे नाव असून, गुरुवारी त्यांचे नवी मुंबईत आगमन झाले. ६ जुलै रोजी त्यांनी गोवा येथून सुमारे ६०० कि.मी.च्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. मूळच्या काश्मीरच्या सुफी यांनी पाच वर्षांपूर्वी श्रीनगर सोडून गोव्यातच मुक्काम केला आहे. यादरम्यान सन २०१० मध्ये त्यांच्या दुर्लक्षामुळे ९ श्वानांचा मृत्यू झाल्याची घटना त्यांच्या मनाला लागली. तेव्हापासून सुफी यांनी हिमाचल ते दिल्ली, काश्मीर ते मुंबई असा पायी प्रवास केला आहे. यानंतर गोवा ते मुंबई पदयात्रा करून भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न शासनापुढे मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर कोकणातून ते येत असताना तिथले मोहम्मद मुल्ला यांनाही त्यांचा उपक्रम आवडल्याने तेदेखील त्यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रवासात त्यांनी रस्त्यालगतच्या अनेक भटक्या कुत्र्यांवर उपचार करून काहींना प्रवासात सोबत घेतले आहे.
मात्र अद्यापपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आपल्याला केवळ सहानुभूती मिळाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबतचा एक श्वान काही दिवसांपासून आजारी आहे. मात्र श्वानप्रेमाच्या घोषणा करीत निधी लाटणाऱ्यांपैकी एकही संस्था त्याच्या मदतीसाठी पुढे आलेली नाही. अशा संस्थांनी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून श्वानांची काळजी घेतल्यास एकाही भटक्या श्वानाचा आजाराने मृत्यू होणार नाही, असाही त्यांचा विश्वास आहे. मात्र दिवसभराच्या प्रवासानंतर रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांना रस्त्यालगतच निवारा शोधावा लागत आहे. सोबत कुत्रे असल्याने त्यांना निवारा केंद्रात किंवा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. वाहन अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वाहनचालकावर कारवाई होते. मात्र त्याच वाहनाच्या धडकेने एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास कसलीही कारवाई होत नाही. त्यामुळे यासंबंधीचा देशात कायदा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.