ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 20 - नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी बनावट दारु प्रकरणी अटक केलेला म्हापशातील वाळके वाइन्सचा गीतेश नीळकंठ वाळके याने आपण शेट्टी नामक व्यक्तीला दर पंधरवड्याला दारुचे सुमारे १८00 बॉक्स विकत होतो अशी कबुली दिल्याने वाळके याचे आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहेत. महाराष्ट्रात तो आणखी कोणाला बनावट दारुच्या बाटल्या पुरवित होता याचीही कसून तपासणी सुरु आहे.
रबाळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक राहुल सोनावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गीतेश याची बँक खाती तपासण्यात येत आहेत. तो बँकेमार्फत व्यवहार करायची की हवालाव्दारे याची चौकशी चालू आहे. या प्रकरणातील सूत्रधार शेट्टी नामक व्यक्ती सध्या फरार आहे त्याला आपण गोव्यातून दर पंधरा दिवसांनी तीन ट्रक भरुन माल पाठवायचो, असे गीतेश याने कबूल केले आहे. ब्लॅण्डर स्प्राइड, मॅकडॉवेल वन, रॉयल स्टॅग आदी मोठ्या ब्रॅण्डच्या बाटल्या असल्याचे भासवून बनावट दारु पाठवली जात असे, असा आरोप आहे.
नवी मुंबईत काही दिवसांपूर्वी असाच एक ट्रक पकडल्यानंतर बनावट दारुचे हे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात ट्रक चालकाला अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरुन तेथे असलेल्या गोदामापर्यंंत पोलिस पोचले. तेथे महागड्या व्हिस्कीच्या ब्रॅण्डचे स्टिकर्स तसेच बाटल्यांची बुचे (झाकणे) जप्त करण्यात आली होती. तपासात गीतेश वाळके याचे नाव पुढे आले आणि रबाळे पोलिस स्थानकाचे अधिकारी चौकशीसाठी गोव्यात येऊन धडकले. गीतेश याने अटक चुकविण्यासाठी नवी मुंबईतही अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केला परंतु तो फेटाळण्यात आला. अखेर त्याला
दोन दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली. तो ज्या व्यक्तीला माल पुरवित होता त्या शेट्टी नामक व्यक्तीवर ठाणे, नवी मुंबई परिसरात याआधीही पाच ते सहा गुन्हे नोंद आहेत. सध्या तो फरार असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली.
गोव्यातून वाळके याच्याकडून गेल्या किती वर्षांपासून हा व्यवहार चालू आहे. नवी मुंबई किंवा महाराष्ट्रात आणखी कुठे तो माल पाठवत होता याबाबतही कसून चौकशी चालू आहे.
सोनावणे यांच्या म्हणण्यानुसार गोव्यातून पाठवल्या जाणाºया बनावट दारु रॅकेटमधील अन्य काही प्रकरणेही यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे त्या दिशेने तपास चालू आहे.