एमआयडीसीतील रस्त्यांना आले गोडाऊनचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:44 AM2018-12-11T00:44:13+5:302018-12-11T00:44:37+5:30
रासायनिक साठ्यामुळे दुर्घटनेची शक्यता
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : प्रशासनाच्या अर्थपूर्ण हितसंबंधामुळे एमआयडीसीतल्या रस्त्यांचा गोडाऊन म्हणून वापर होताना दिसत आहे. संपूर्ण औद्योगिक पट्ट्यात जागोजागी हे चित्र पाहायला मिळत असून त्याठिकाणी ज्वलनशील रासायनिक पदार्थांचाही साठा असल्याचे समजते. यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता असतानाही त्याकडे डोळेझाक होत आहे.
आशिया खंडातला मोठा औद्योगिक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमआयडीसी परिसरातील अनेक मोठमोठ्या उद्योग, व्यवसायांना घरघर लागली आहे. विविध कारणांमुळे अनेकांनी आपले व्यवसाय इतरत्र हलवल्याने एमआयडीसी प्रशासनानेही तिथल्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. यातूनच काही उद्योजकांनी एमआयडीसी परिसरातले रस्ते, मोकळी मैदाने तसेच कंपनीच्या आवारातील शिल्लक जागा देखील गोडाऊन म्हणून वापराला सुरवात केली आहे, तर काहींनी आपला सातबारा दाखवून बºयाच ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालवले आहेत. त्यानुसार रस्त्यांवर तसेच मोकळ्या जागेत कंपन्यांचे साहित्य साठवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्वलनशील पदार्थांसह इतर रासायनिक द्रवांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी भंगाराचे साहित्य साठवण्यासाठी देखील रस्ते अडवण्यात आले आहेत. यामुळे कामगार वर्गासह इतर सर्वसामान्यांना अशा ठिकाणी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्याठिकाणी आगीची घटना घडल्यास संपूर्ण परिसरात अग्नितांडव होवून मोठ्या जीवितहानीची शक्यता आहे. यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांची त्याकडे अर्थपूर्ण डोळेझाक होत असल्याचा आरोप शिरीष पाटील यांनी केला आहे.
एमआयडीसी परिसरात भंगार माफियांचे मोठे रॅकेट सक्रिय असून त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत आहे. त्यात काही लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडूनच एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेवरील तसेच रस्त्यांवर उघडपणे बेकायदेशीररीत्या चालवल्या जाणाºया भंगाराच्या गोडाऊनला देखील वरदहस्त लाभत असल्याचा आरोप होत आहे.