समुद्रकिनारी हवेत गोएन्स बंधारे
By admin | Published: February 5, 2016 02:56 AM2016-02-05T02:56:44+5:302016-02-05T02:56:44+5:30
समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे
जंजिरा : समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे, अशी मागणी मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अशोक धुमाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली.
समुद्रकिनारी गोएन्स बंधारा ही मागणी गेली दोन दशके शासनाकडे सुरु आहे. संतोष नवआळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद असतानापासून हा प्रस्ताव आहे. या बंधाऱ्यामुळे सध्या असलेला धोकादायक भोवऱ्याची जागा नष्ट होवून समुद्रकिनारा पूर्णत: सुरक्षित होणार आहे. मच्छीमार बोटींना भरतीपर्यंत थांबावे लागते. त्यामधून होणारे आर्थिक नुकसान थांबू शकेल. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानापासून सदरची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे.
हा बंधारा तवसाळकर वाडीपासून दुर्घटनाग्रस्त जागेपर्यंत पूर्व-पश्चिम होऊ शकेल. यामुळे नैसर्गिक खाडीमुखाचा भाग खोल व सुरक्षित होईल. बंधाऱ्याचा बाकी परिसर पर्यटकांना स्वच्छतागृह व इतर सुविधांसाठी होवू शकेल. शासनाकडून भौगोलिक अभ्यास घेऊन हा बंधारा व्हावा, अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
तसेच संपूर्ण अडीच कि.मी. किनारपट्टी सुरक्षित राहावी याकरिता टेहळणी मनोरा, शासनाकडून कायमस्वरुपी जीवरक्षक नेमणूक, संपूर्ण समुद्रकिनारा सुशोभीकरण व पर्यटन सक्षम होण्यासाठी मदत, किनारपट्टी धूपप्रतिबंधक बंधारा याकरिता शासनाने विशेष पर्यटन विकासनिधी तातडीने द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे आमदार पंडित पाटील यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मृत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देवून त्यांचे जीवन परत मिळणार नाही. पण सरकारने वेळीच मुरुडकरांची मागणी पूर्ण केली असती तर कदाचित पुण्याचे हे दुर्दैवी विद्यार्थी वाचले असते, असे संवेदनशील प्रतिपादन पाटील यांनी केले. आता तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)