सोने खरेदीत दुपटीने वाढ
By Admin | Published: April 29, 2017 01:56 AM2017-04-29T01:56:04+5:302017-04-29T01:56:04+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेनिमित्त शहरातील सराफा बाजार तेजीत आला असून, सोन्याच्या खरेदीला
नवी मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेनिमित्त शहरातील सराफा बाजार तेजीत आला असून, सोन्याच्या खरेदीला ग्राहकवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नोटाबंदीनंतर सराफा व्यावसायिकांना प्रथमच अच्छे दिन आले असल्याचे दिसून येते. गुढीपाडव्याच्या तुलनेत सोनेखरेदीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढल्याची प्रतिक्रिया सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
अक्षय्यतृतीयेला सोनेखरेदी करणे किंवा सोन्याचे दागिने भेट म्हणून दिल्यास ते अक्षय्य म्हणजेच कधीही संपत नाहीत, अशी कल्पना आहे. शिवाय या दिवशी कोणताही मुहूर्त पाहवा लागत नसल्याने किरकोळ खरेदी करणारे ग्राहक थेट सराफा दुकानात येऊन दागिने खरेदी करतात. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे; परंतु नोटाबंदीनंतर चलन तुटवडा जाणवू लागल्यापासून सराफा बाजारावर मंदीचे सावट पसरले होते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदी केली; पण ही खरेदी सरासरीपेक्षा अधिक नव्हती. त्यामुळे सराफा व्यवसायात खऱ्या अर्थाने तेजी आलीच नाही. मात्र, अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोनेखरेदीला चांगलाच वाव मिळाला असून ग्राहकांनी हा मुहूर्त न चुकवता मनजोगी खरेदी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. लग्नसराईनिमित्त आगाऊ दागिन्यांच्या बुकिंगलाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सराफ व्यापारी महेंद्र जैन यांनी दिली. (प्रतिनिधी)