देवीच्या पूजेच्या बहाण्याने लुटले सोने; संकट टाळण्यासाठी भंडारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:24 AM2018-07-01T03:24:08+5:302018-07-01T03:24:31+5:30
कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : कुटुंबावरील संकट टाळण्याकरिता देवीचा भंडारा घालण्याच्या बहाण्याने सोने लुटल्याचा प्रकार एपीएमसीत घडला आहे. या प्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पूजेच्या बहाण्याने सोन्याचे दागिने देवीसमोर ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने चोरून नेले.
एपीएमसी येथील हिमानी जैन (२७) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्या बदलापूरच्या राहणाऱ्या असून, एपीएमसी सेक्टर १९ येथे अकाउंटंट म्हणून नोकरी करतात. गुरुवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कार्यालयात आल्या असता, दोन पुजारी त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी जैन यांना देवीच्या भंडाºयासाठी पैशांची मागणी केली; परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्या दोघांपैकी एका व्यक्तीने परत त्यांच्या कार्यालयात जैन यांच्या कुटुंबाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. यामुळे जैन यांचा त्याच्या भाकितावर विश्वास बसू लागल्यानंतर त्या व्यक्तीने जैन यांना त्यांच्या कुटुंबीयांवर संकट असल्याचे सांगितले. हे संकट दूर करण्यासाठी देवीचा भंडारा घालतो, असे सांगून सदर व्यक्तीने जैन यांच्याकडे ११ हजार रुपयांची मागणी केली; परंतु तेवढे पैसे नसल्याने जैन यांनी सांगितल्याने सदर भामट्याने त्यांना १०० रुपयांत पूजा करून देतो, असे सांगितले. त्याकरिता अंगावरील सोन्याचे दागिने पूजेसाठी देवीपुढे ठेवायला सांगितले. त्यानुसार जैन यांनी अंगठी व चेन असा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज देवीच्या प्रतिमेपुढे ठेवला होता. या वेळी भामट्याने काही मिनिटे पूजा केल्यानंतर ते दागिने कागदात गुंडाळून देवीच्या प्रतिमेपुढे ठेवून अर्ध्या तासाने घेण्याचे सुचवले. ही पूजा संपल्यानंतर जैन यांनी त्यास पूजेची दक्षिणा म्हणून १०० रुपये दिले असता, त्याने ५० रुपये परत देऊन गेल्यानंतर जैन यांनी कागदी पुडीतले दागिने तपासले असता त्यामध्ये ते आढळले नाहीत.