नवी मुंबई : यावर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिर्ची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते. परंतु हळदीला अपेक्षीत दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले होते.गत हंगामामध्ये अपेक्षीत लाभ न झाल्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांना यावर्षी दिलासा मिळाला आहे. गत वर्षी मुंबई बाजार समितीमध्ये हळद प्रतीकिलो ९० ते १३० रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी हे च दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहचले आहेत. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन ३० ते ५० टन हळदीची विक्री होत आहे. उन्हाळ्यामध्ये लग्नसराई, चटणी तयार करणे यासाठी हळद व हळकुंडांना मागणी वाढते. यामुळे पुढील दोन महिने हळदीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबई बाहेरील बाजारपेठांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गतवर्षी हळदीचे दर कमी होते. यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट
जगातील सर्वाधीक हळद उत्पादन भारतातजगातील सर्वात जास्त हळदीचे उत्पादन भारतामध्ये होते. २०२२ - २३ मध्ये ३.२४ लाख हेक्टरवर हळद लागवड केली होती. ११.६१ लाख टन हळदीचे उत्पादन झाले होते. जगातील उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन फक्त भारतामध्ये होते. युएई, युएसए, मलेशिया, बांगलादेश व इतर देशात निर्यात केली जाते. देशात ३० पेक्षा जास्त जातीच्या हळदीची लागवड केली जाते.
तामिळनाडूसह महाराष्ट्राची आघाडीदेशात तामिळनाडू व महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधीक उत्पादन होते. तेलंगणा, कर्नाटमध्येही मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, हिंगोली परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
औषधी गुणधर्म
हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांकडून आहारामध्येही हळदीला नेहमी प्राधान्य दिले जाते. औषध, सौंदर्य प्रसाधनामध्येही हळदीचा उपयोग केला जातो. धार्मीक कार्यक्रम व लग्नकार्यातही हळदीचा वापर होत असतो.