गोल्फ कोर्सची जागा पाणथळाची नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:27 PM2020-02-11T23:27:43+5:302020-02-11T23:27:59+5:30
जिल्हा प्रशासनाच्या यादीतून नाव गायब : पर्यावरणप्रेमींकडून संताप; नियोजित क्षेत्र अधिसूचित करण्याची मागणी
नवी मुंबई : पर्यावरणप्रेमींच्या रोषाला कारणीभूत ठरलेल्या सिडकोच्या सीवूड येथील नियोजित गोल्फ कोर्सच्या जागेवर पाणथळ क्षेत्र नसल्याचे ठाणे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पाणथळ्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात गोल्फ कोर्स उभारण्यात येत असलेल्या जागेचा उल्लेख नसल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
पामबीच मार्गालगत सीवूड येथे सुमारे ३५ हेक्टर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्यात येत आहे. त्यासाठी मातीचा भराव टाकून जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यातील जवळपास ३३ हेक्टर क्षेत्रावर पाणथळा असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने फ्लेमिंगो येतात. प्रकल्पामुळे फ्लेमिंगोचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच पाणथळ क्षेत्रातील खारफुटी तोडल्याने पर्यावरणाचाही ºहास होत असल्याची तक्रार आहे. प्रकल्पासाठी या क्षेत्रातील जवळपास ७०० वृक्षांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे संतप्त पर्यावरणप्रेमी व स्थानिक रहिवाशांनी गेल्या महिन्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे या प्रकरणी दाद मागितली. त्यानुसार २८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पर्यावरणाला बाधा निर्माण करणारा गोल्फ कोर्सचा प्रकल्प बंद करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले होते. तसेच या ठिकाणी अभयारण्य किंवा मॅन्ग्रोज पार्क करता येईल, याबाबत चाचपणी करण्याचे निर्देशसुद्धा सिडकोला दिले होते. मात्र, पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सिडकोने गोल्फ कोर्स प्रकल्पाचे काम सुरूच ठेवल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
सिडकोच्या या भूमिकेविषयी पर्यावरणप्रेमींकडून तीव्र भावना व्यक्त होत असतानाच ठाणे जिल्हा प्रशासनाने गोल्फ कोर्स उभारण्यात येत असलेली जागा पाणथळा क्षेत्र नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या पाणथळ क्षेत्राच्या यादीत नवी मुंबईतील फक्त तीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. यात सीवूड येथील गोल्फ कोर्सच्या जागेचा समावेश करण्यात आलेल्या नाही, त्यामुळे जिल्हा प्रशासनसुद्धा सिडकोला झुकते माप देत असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
पाणथळ क्षेत्राच्या सर्व्हेक्षणाबाबत संभ्रम
जिल्हा प्रशासनाच्या तहसील कार्यालयाने अलिकडेच शहरातील पाणथळा क्षेत्राचे सर्व्हेक्षण केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी शहरात १९ पाणथळ्यांची नोंद होती. नव्या यादीत यातील फक्त तीन पाणथळा क्षेत्र अधोरेखीत करण्यात आले आहेत. तर एका ठिकाणी पाणथळा नव्हताच, असे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित पंधरा क्षेत्रात पाणथळा नसल्याचे या सुधारित यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणाबाबत संभ्रम निर्माण झाला असून पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
प्रशासनाच्या कृतीतून पर्यावरणविषयक उदासीनता
जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या संदर्भावरून पाणथळ क्षेत्राची यादी तयार केली आहे. ही यादी कोणत्या अधिकाऱ्यांनी तयार केली याबाबत संभ्रम आहे. मुळात सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या जागेवर नैसर्गिक पाणथळा आहे. खाडीच्या भरतीचे पाणी येथे रोखून धरले जाते. तसेच या ठिकाणी फ्लेमिंगोचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. जिल्हा प्रशासनाच्या कृतीतून पर्यावरणविषयक उदासीनता दिसून येते, असे पर्यावरण विषयक क्षेत्रात काम करणाºया नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित गोल्फ कोर्सची जागा पाणथळ क्षेत्राची आहे. ही बाब उच्च न्यायालयानेही मान्य केली आहे. त्यामुळे हा परिसर पाणथळ क्षेत्र म्हणून अधिसूचित करावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमी आपापल्या स्तरावर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना यासंदर्भात आतापर्यंत ६०० ईमेल पाठविले आहेत. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. - सुनील अग्रवाल, याचिकाकर्ते