नवी मुंबई : पाम बीच रोडला लागून प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्पामुळे पाणथळ क्षेत्रासह फ्लेमिंगोचे आश्रयस्थानही नष्ट होणार असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. येथील भूखंडावरील जवळपास ७०० वृक्ष सिडकोच्या परवानगीनंतर तोडण्यात आले आहेत. याविषयीही पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाम बीच रोडला लागून एनआरआय फेज दोन व टी.एस. चाणक्य दरम्यान सिडकोने ३५.५५ हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यामधील जवळपास ३३ हेक्टर क्षेत्र पाणथळ परिसरात असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या परिसरामध्ये १८ होलचा गोल्फ कोर्स प्रस्तावित आहे. येथील दीड हेक्टर जमिनीवर इमारती बांधण्यासाठी परवानगी आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनील अगरवाल यांनी व इतर पर्यावरणप्रेमीसंस्थांनी पर्यावरणाची हानी थांबविण्यासाठी आवाज उठविला आहे. याविषयी उच्च न्यायालयात दावाही दाखल केला होता. सद्यस्थितीमध्ये याविषयी दावा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गोल्फ कोर्स उभा राहिल्यास येथील पाणथळ क्षेत्र नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. एनआरआयच्या मागील बाजूला व टी. एस. चाणक्यच्या परिसरामध्ये प्रत्येक वर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी वास्तव्यास येत असतात. या प्रकल्पामुळे त्यांचा अधिवास धोक्यात येऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी या परिसरामध्ये कोणतेही विकासकाम केले जाऊ नये यासाठी शासनस्तरावरही पाठपुरावा सुरू केला आहे.
एनआरआय कॉम्प्लेक्सला लागून असलेल्या भूखंडावरील वृक्ष तोडण्यासाठी सिडकोने विकासकाला परवानगी दिली आहे. रविवारी या भूखंडावरील जवळपास ७०० वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीविषयी पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी शासनाकडे तक्रार केली आहे. न्यायालयाच्याही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असली तरी सिडको प्रशासनाने मात्र आम्ही नियमाप्रमाणेच वृक्षतोड करण्यास परवानगी दिली असल्याचे स्पष्ट केले आहे.सिडकोचे स्पष्टीकरणएनआरआय परिसरातील वृक्षतोडीविषयी पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सिडकोने या विषयी बाजू मांडताना पॉकेट डी व ई सेक्टर ६० हा उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेचा विषय नाही. सिडको हे स्वतंत्र नियोजन प्राधिकरण असून वृक्षप्राधिकरणाचे अधिकारही आहेत. सिडकोच्या वृक्ष प्राधिकरणाने नियमाप्रमाणे परवानगी दिली असल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.प्रस्तावित गोल्फ कोर्ससाठी उपलब्ध करून दिलेले भूखंड पाणथळ क्षेत्रात येत आहेत, यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. फ्लेमिंगोंचा अधिवासही धोक्यात येणार आहे, यामुळे आम्ही पर्यावरण रक्षणासाठी लढा देत आहोत. वृक्षतोडीविषयीही शासनाकडे तक्रार केली असून, न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देणार आहोत. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी