Good Bye 2019 : नववर्षाच्या स्वागतासाठी पनवेलमधील सुकापुरात अनोखा देखावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 08:03 PM2019-12-31T20:03:37+5:302019-12-31T20:03:49+5:30
31 डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत म्हटले की पार्ट्यांचा बेत, फूल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे.
वैभव गायकर
पनवेल: 31 डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत म्हटले की पार्ट्यांचा बेत, फूल ऑन सेलिब्रेशन, मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे. मात्र या दिवशी आयुष्याला कलाटणी देणा-या घटना घडत असतात. याकरिता पनवेलमधील सुकापुरात राकेश चंद्रकांत केणी(वय 26)या तरुणाने एक संदेशात्मक देखावा उभारला आहे. पनवेल परिसरात हा देखावा सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे.
या देखाव्यात 31 सेलिब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात. यावेळी वाहन चालक मद्यपान करून आपल्याच अपघाताला निमंत्रण देत असतो. याकरिता या तरुणाने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत अनोखा संदेशात्मक देखावा उभारला आहे .यामध्ये दारू पिऊन वाहने चालवू नका, महिलांवरील अत्याचार थांबवा, द दारूचा नव्हे.. द दुधाचा आदींसह झाडे लावा, झाडे जगावा आदी संदेश देणारी फलकं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. हा देखावा उभारताना अपघातग्रस्त कार देखील याठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे देखावे पोलीस ठिकठिकाणी उभारून नागरिकांना सतर्क करत असतात. मात्र तरुण वयात एकीकडे तरुणमध्ये पार्ट्यांचे बेत शिजत असताना राकेश चंद्रकात केणी या तरुणाने उभारलेला देखावा खरोखरच कौतुकास्पद आहे.
दरवर्षी नावीन्यपूर्ण देखावे
दरवर्षी राकेश केणी आपले वडील चंद्रकांत केणी यांच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण देखावे उभारत असतात. पोलिसांमार्फत 31 डिसेंबर निमित्ताने सर्वत्र जनजागृती केली जात असते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राकेश केणी अनोखा देखावा उभारत असतो. हा संदेशात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुकापूर येथे पाहावयास मिळत आहे.