शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:53 PM2019-04-18T23:53:33+5:302019-04-18T23:53:56+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत.
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे शहरातील नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत. प्रचाराच्या कामात या कष्टकरी मजूर वर्गाचा राजकीय पक्षांना विविध स्तरावर चांगलाच उपयोग होतो. त्यामुळे सध्या या कामगारांचा भाव वधारल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सकाळच्या वेळी नेहमी गजबजून जाणारे कामगार नाके मागील काही दिवसांपासून ओस पडले आहेत.
नवी मुंबई शहरात दहा ते पंधरा ठिकाणी प्रमुख कामगार नाके आहेत. त्याशिवाय लहान-मोठ्या चौकात दरररोज सकाळी रोजंदारीच्या शोधात कामगारांचा मेळा भरतो. ढोबळ अंदाजानुसार नवी मुंबईत पाच ते सहा हजार नाका कामगार आहेत. यात परप्रांतीयांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. यातील प्रत्येकाला दरदिवशी रोजगार मिळतोच असे नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे यातील प्रत्येकाला आता रोजगाराची हमी मिळाली आहे. पुढील काही दिवस तरी रोजगाराचा प्रश्न मिटल्याने या कामगारांत आनंदाचे वातावरण आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात खरी चुरस असणार आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संवाद साधला जात आहे. उपाशीपोटी प्रचारात झोकून देणारे कार्यकर्ते आता कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रचारासाठी आता नाका कामगारांची गरज भासू लागली आहे. प्रचाराची पत्रके वाटणे, फलक व होर्डिंग लावणे, गर्दी वाढविणे, घोषणा देणे आदी कामांसाठी बहुतांशी नेत्यांची भिस्त नाका कामगारांवर असल्याचे दिसून येते. त्यातल्या त्यात प्रचाराच्या रॅलीसाठी महिला कामगारांना अधिक पसंती असल्याचे समजते. प्रचार कामात सहभागी होणाºया पुरुष कामगाराला दिवसाला किमान ५00 तर महिला कर्मचाºयाला ३00 रुपये मिळतात. त्याशिवाय नाष्टा, दोन वेळचे जेवण व प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दिवसभराच्या प्रचारानंतर रात्रीच्या सभेसाठी अतिरिक्त मानधन दिले जाते, अशी माहिती एका कामगाराने दिली. बांधकामासाठी कामगार पुरविणारे कंत्राटदारच नाका कामगार आणि नेते यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रचाराच्या वेळापत्रकानुसार या कामगारांना निश्चित ठिकाणांवर सोडण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते.
>बांधकामांसाठी मजुरांचा तुटवडा
शहरातील बहुतांशी कामगार सध्या निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांना मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. कामगार नाक्यावर पुरुष व महिला मजूर, गवंडी, रंगारी, सुतार, प्लंबर आदी घटकांतील कामगार रोजंदारीसाठी उभे असतात. यातील मजूर वगळता उर्वरित घटकांची दैनंदिन रोजंदारी ८00 ते १000 रुपयांच्या घरात आहे. प्रचाराच्या कामासाठी ३00 ते ५00 रुपये इतकेच मानधन मिळत असल्याने हा घटक निवडणूक प्रचारात सहभागी होण्यास फारसा उत्सुक नसतो.
>प्रमुख कामगार नाके
दिघा (महापालिका तलाव), ऐरोली नाका, नोसिल नाका, घणसोली (दगडू चाहू पाटील चौक), कोपरी गाव (हनुमान मंदिर सर्कल), कोपरखैरणे (रांजणदेवी चौक), कोपरखैरणे (सेक्टर ६), वाशी (सेक्टर १५), नेरूळ (एलपी सिग्नल) ही शहरातील काही प्रमुख कामगार नाके आहेत. मागील आठ दिवसांपासून या नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावल्याचे दिसून आले आहे.