सिडकोच्या शिल्लक घरांनाही ग्राहकांकडून चांगली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:08 AM2019-01-04T00:08:05+5:302019-01-04T00:11:27+5:30
सिडकोच्या वतीने आॅगस्ट महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या १४८३८ घरांपैकी विक्री न झालेले ११00 घरे शिल्लक आहेत. या घरांची ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
नवी मुंबई : सिडकोच्या वतीने आॅगस्ट महिन्यात जाहिर करण्यात आलेल्या १४८३८ घरांपैकी विक्री न झालेले ११00 घरे शिल्लक आहेत. या घरांची ताबडतोब विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून या शिल्लक घरांसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या शिल्लक घरांसाठी तीन दिवसांत ५३00 अर्जदारांनी अर्ज केले आहेत. तर ११३0 ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणाही केला आहे. यावरून सिडकोच्या घरांसाठी प्रतिक्षा यादी मोठी असल्याचे दिसून आले आहे.
आॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी १४८३८ घरांच्या गृहयोजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेला राज्यभरातील ग्राहकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. १४८३८ घरांसाठी सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. यातील पात्र दर्जदारांची आॅक्टोबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. यात यशस्वी झालेल्या अर्जदारांच्या कादपत्रांची छाननी व इतर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत.
असे असले तरी १४८३४ पैकी तब्बल ११00 घरे विक्रीविना पडून आहेत. यातील बहुतांशी घरे तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये आहेत. त्यामुळे या शिल्लक घरांची सुध्दा विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्यानुसार मंगळवारी सिडकोच्या मुंबईतील निर्मल कार्यालयात अकराशे घरांसाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पहिल्या सोडतीत संधी हुकलेल्यांना ही सुवर्ण संधी असल्याने मागील तीन दिवसांपासून ग्राहकांनी ५३00 अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता सिडकोच्या संबधित विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, शिल्लक घरांसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची फेब्रुवारी महिन्यात सोडत काढली जाणार आहे.