नवी मुंबई : होळी व धूलिवंदनला सर्व बाजारपेठा बंद असताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केट रविवारी होळीच्या दिवशी सुरू ठेवले होते. दिवसभरात ३६ हजार पेट्या आंब्याची आवक झाली. धूलिवंदना दिवशीही मुंबईकरांना सुरळीत भाजीपाला पोहोचविला असून, सोमवारी पहाटेपर्यंत १३१९ टन भाजीपाल्याची विक्री झाली होती.
मुंबई, नवी मुंबईतील बहुतांश बाजारपेठा दोन दिवस बंद होत्या. रविवारी होळीमुळे तर सोमवारी धूलिवंदनानिमित्त मार्केट बंद होते. प्रत्येक विभागात दूध व रंगांची विक्री करणारी दुकाने खुली होती. राज्यात सर्वत्र आंब्याचा हंगाम सुरू आहे. सलग दोन दिवस मार्केट बंद राहिल्यामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने रविवारी व्यापार सुरू ठेवण्यास परवानगी दिली हाेती.
होळीच्या दिवशी मार्केटमध्ये कोकणातून ३०६८१ पेट्या व इतर राज्यातून ६०५७ अशा एकूण ३६ हजार ७३८ पेट्या आंब्याची आवक झाली आहे. सोमवारी फळ मार्केट बंद ठेवण्यात आले होते.
२ लाख ५९ हजार पालेभाज्यांच्या जुडींची विक्री भाजीपाला मार्केट धूलिवंदनच्या दिवशी सुरू ठेवले होते. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटे ८ वाजेपर्यंत भाजीपाला मार्केटमध्ये १३१९ टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यात २ लाख ५९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. सर्व भाजीपाल्याची पहाटेच विक्री झाली आहे. जवळपास सर्वच भाज्यांचे दरही कमी झाले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.