दिवाळीत घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सिडकोची ७,८४९ घरांची लॉटरी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 10:30 AM2022-10-24T10:30:46+5:302022-10-24T10:31:19+5:30
सिडकोनं जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे
नवी मुंबई - आपल्या हक्काचं घर असावं हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असतं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन दिवाळीत सिडकोनं तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर हक्काचं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सिडकोने तब्बल ७ हजार ८४९ घरांसाठी लॉटरी जाहीर करत खास भेट दिली आहे. नवी मुंबई शहरात आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न तुम्हाला साकारता येणार आहे.
स्वस्तात मिळणार घरे
सिडकोनं जाहीर केलेली ही घरे नवी मुंबईतील खारकोपर, बामणडोंगरी इथे आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, ट्रान्सहार्बर रोड या नजीक हा प्रकल्प आहे. घरांच्या लॉटरीसाठी उद्यापासून नोंदणी करता येईल. त्याचसोबत सिडकोनं ऑगस्ट २०२२ मध्ये काढलेल्या ४ हजार १५८ घरांच्या नोंदणीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा, खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४१५८ घरांपैकी ४०४ घरे ही पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. त्यात २४५ व्यापारी गाळ्यांची लॉटरी काढण्यात आली होती.