नवी मुंबई : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दसऱ्याआधी २५ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेअंतर्गत ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर ही घरे उपलब्ध होतील. त्यांच्या किमतीही बाजारभावापेक्षा कमी असतील, अशी माहिती सिडकोचे एमडी विजय सिंघल यांनी ‘लोकमत’ला दिली.
अल्प उत्पन्न घटकांना लाभ
शहराच्या विविध भागांतील २७ ठिकाणी ही ६७ हजार घरे बांधण्याचे प्रस्तावित आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यातील २५ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याची योजना आहे. यातील बहुतांशी घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी असणार आहेत, असे विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.
कुठल्या घरांचा होणार समावेश?
दरम्यान, सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाठ हे मंगळवारी विविध भागातील गृहप्रकल्पांच्या कामांची पाहणी करणार आहेत. प्रस्तावित योजनेत कोणत्या विभागातील घरांचा समावेश करायचा याचा आढावा घेणार आहेत.
त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम आराखडा तयार करून योजना जाहीर केली जाईल. या योजनेत तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, करंजाडेसह मानसरोवर, खारघर, जुईनगर आणि वाशी येथील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मार्केटिंग कंपनीचे भवितव्य अधांतरी?
घरांचे मार्केटिंग आणि विक्री करण्यासाठी सिडकोने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेचा वाद मागील दीड वर्षापासून नगरविकास विभागाकडे निवाड्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नवीन गृहयोजना जाहीर करताना सिडकोची कोंडी होत आहे.
मात्र, आता अधिक प्रतीक्षा न करता या घरांच्या विक्रीसाठी ‘बुक माय सिडको होम’ अर्थात ‘निवडा तुमच्या आवडीचे घर’ या संकल्पनेचा अवलंब करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
याअंतर्गत ग्राहकांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर त्यांच्या पसंतीचे घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. याअंतर्गत विमान तिकिटाच्या धर्तीवर ग्राहकांना आपल्या पसंतीचे घर सिलेक्ट करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.