लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. आता तर गणेशोत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीही मोठी आहे. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात कोच वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे याचा लाभ गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना होणार आहे.हापा-मडगाव (२२९०८) एक्स्प्रेसमध्ये २३ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच वाढविला आहे. मडगाव-हापा (२२९०७) एक्स्प्रेसमध्ये २५ ऑगस्टला एक अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे. पोरबंदर-कोचुवेली (२०९१०) आणि कोचुवेली ते पोरबंदर (२०९०९) या एक्स्प्रेसमध्ये अनुक्रमे २४ आणि २७ ऑगस्टला एक अतिरिक्त कोच जोडला जाणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
रत्नागिरी - वैभववाडीदरम्यान आज मेगाब्लॉक
कोकण रेल्वे मार्गावरील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बुधवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० ते १०:३० यावेळेत तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रत्नागिरी - वैभववाडीदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होणार आहे.
मार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही दिनांक २३ ऑगस्ट रोजी प्रवास होणारी गाडी रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास थांबवून ठेवली जाणार आहे. तसेच १६३४६ तिरुवनंतपूरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी जिचा प्रवास २२ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या असेल ती कोकण रेल्वे मार्गावरील उड्डपी ते कणकवली दरम्यान सुमारे तीन तास थांबवून ठेवली जाणार आहे.