- नामदेव मोरे
नवी मुंबई : २०२१ च्या आरंभी नवी मुंबईतही दुसरी लाट सुरू झाली. संपूर्ण वर्ष ही लाट थोपविण्यात गेले. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असताना वर्षअखेरीस पुन्हा तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्याने शहरवासीयांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन, अमली पदार्थांची तस्करी व अनेक महत्वाच्या घटनांनी संपूर्ण वर्ष गाजले. स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांकासह पाच विभागात मानांकन मिळाल्याने नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी मानाचे तुरे खोवले गेले.
नवी मुंबईमध्ये २०२१ च्या सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. यामुळे शहरवासीयांनी मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले. फेब्रुवारीच्या सुरुवातीला शासनाने रेल्वे सेवाही सर्वांसाठी खुली केली. यामुळे नोकरदार वर्गात समाधानाचे वातावरण पसरले होते. परंतु तेव्हापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाचा स्फोट झाला व रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील झाले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. इंजेक्शनचा काळाबाजारही सुरु झाला.
प्रतिदिन १ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले होते. मनपा प्रशासनाने बेडची संख्या वाढविली, आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची संख्याही युद्धपातळीवर वाढविली. चाचण्यांचे प्रमाण वाढविले व टप्प्याटप्प्याने कोरोना नियंत्रणात आणला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत स्थिती समाधानकारक होती. पण मागील काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत असून २९ डिसेंबरला एकाच दिवशी रुग्णसंख्या दुप्पट झाल्याने तिसरी लाट पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचे सावट असतानाही महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. १० ते ४० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महानगरपालिकेने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशात द्वितीय क्रमांक, कचरा मुक्त शहराचे फाईव्ह स्टार मानांकन, ओडीएफ कॅटेगरीमध्ये वॉटरप्लस मानांकनही मिळविले आहे.
वर्षभरातील महत्त्वाच्या घडामोडी
२९ जानेवारी - मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने २४८ कोटीचा अर्थसंकल्प सुरू केला. १६ जानेवारी - नवी मुंबईसह पनवेलमध्येही कोरोना लसीकरणाला सुरुवात २५ फेब्रुवारी - ॲँटीजेन चाचणीमध्ये घोटाळा उघडकीस, ७८७२ बोगस नावे असल्याचे निदर्शनास आले. ७ मार्च - संपूर्ण महिला संचालित जहाज जेएनपीटीतून गुजरातला रवाना.२७ मार्च - सुएझ कालव्यात जेएनपीटीतून गेलेली ९ जहाजे अडकली. २७ मार्च - पनवेलमध्ये २०० किलो गांजाचा साठा हस्तगत, एकास अटक. ४ एप्रिल - सर्वाधिक १४४१ कोरोना रुग्ण एकाच दिवसात वाढले. २ मे - तुर्भेमधील रंग कंपनीला भीषण आग, एक ठार २१ मे - जेएनपीटीमध्ये कंटेनर कार्गोला आग, ३५ टन साहित्य जळून खाक.१ जून - मॉल वगळून इतर सर्व दुकाने सुरू करण्यास शासनाची परवानगी.
४ जुलै - जेएनपीटीमध्ये सापडलेल्या २९० किलो हेरॉईन प्रकरणी पंजाबमधून एकास अटक. २४ जुलै - पांडवकडा परिसरात अडकलेल्या ११६ पर्यटकांची सुटका.२९ जुलै - अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदारावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा. १२ ऑगस्ट - मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे विरोधात पत्नीने दाखल केला गुन्हा. २३ ऑगस्ट - जेएनपीटीमधील कंटेनर टर्मिनलच्या खासगीकरणासाठी प्रशासनाने मागविल्या निविदा. २८ सप्टेंबर - मोरबे धरण झाले ओव्हार फ्लो, नवी मुंबईचा पाणी प्रश्न सुटला.३० सप्टेंबर - योगगुरू सदाशिव निंबाळकर यांचे निधन.१० ऑक्टोबर - जेएनपीटीमध्ये तीळ व मोहरीच्या तेलातून १२५ कोटी रुपयांचे हेरॉईन हस्तगत.७ ऑक्टोबर - नवी मुंबई महानगरपालिकेला डबल ए प्लस पतमानांकन जाहीर.
२० नोव्हेंबर - स्वच्छता अभियानात मोठ्या शहरात नवी मुंबईला प्रथम क्रमांक जाहीर. २९ नोव्हेंबर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची कोकणभवन सीबीआय कार्यालयात चौकशी.१४ डिसेंबर - समीर वानखेडे यांच्या बारला उत्पादनशुल्क विभागाची नोटीस.२६ डिसेंबर - अभिनेता सलमान खानला पनवेलमधील फार्महाऊसमध्ये सर्पदंश२४ जून - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन, ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा आंदोलनात सहभाग.