नवी मुंबई- पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे खोळंबल्या आहेत.
शनिवारची कोकणकन्या एक्स्प्रेस १० तास उशिराने, मुंबई ते सावंतवाडी विशेष ट्रेन १२ तास पुढे ढकलली आहे. तसेच तुतारी आणि मंगलुरू एक्स्प्रेस दिवा आणि निळजे दरम्यान अडकून पडल्या आहेत. कोकणात जाणारे प्रवासी रात्रभर छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ताटकळत बसले आहेत.
मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोळी विभागात एका मालगाडीचा पाच डब्बे रेल्वे रुळांवरुन घसरण्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. पनवेल रेल्वेस्थानकाजवळ एक एस डब्ल्यू कंपनीचा कॉइल घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे डबे रुळावरून दुपारी तीन वाजता घसरलेत. ही मालगाडी पनवेलहून वसईकडे निघाली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालगाडीचा गार्ड मिस्टर रत्नेश सिंग गंभीर जखमी झाला आहे.
मालगाडीच्या अपघातामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी एक्स्प्रेसची वाहतूक मात्र ठप्प झाली होती. या रेल्वे अपघाताचा उपनगरीय सेवेला कोणताही फटका बसलेला नसून ही सेवा सुरळीत सुरू आहे.
दरम्यान, मेल-एक्सप्रेस गाड्यांचा वेळापत्रकांचे कोलमडून पडले. रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास पनवेल ते कळबोली मार्ग दुरुस्त करण्यात रेल्वेला यश आले. मुंबई सेंट्रल- सावंतवाडी एक्स्प्रेस- तळोजा ते पंचानंद स्थानकांवर थांबविण्यात आली होती.
प्रवाशांची पायपीट
मालगाडीच्या अपघातामुळे मेल गाड्यांमधील पनवेलला उतरणाऱ्या प्रवाशांना एक किलोमीटर पायी चालत यावे लागले. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.
या एक्स्प्रेस रोखून ठेवल्या
या अपघातामुळे या मार्गावरून गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस-कळंबोली येथे तर मंगळुरू एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-सावंतवाडी, इंदूर एक्स्प्रेस, एर्नाकुलम- निजामुद्दीन एक्स्प्रेस आदी गाड्या वेगवेगळ्या स्थानकात थांबवून ठेवल्या होत्या.