घणसोलीमध्ये गुंडांचा पोलिसांवर हल्ला; मदतीसाठी गेलेला नागरिक जखमी
By नामदेव मोरे | Published: May 30, 2023 05:54 PM2023-05-30T17:54:30+5:302023-05-30T17:55:12+5:30
चाकूचा धाक दाखवून केले पलायन
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : घणसोलीमधील डी मार्ट मॉल परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री दोन गुंडांनी पोलिसांवर चाकूने हल्ला केला. पोलिसांच्या मदतीला आलेली एक व्यक्ती जखमी झाली आहे. चाकूचा धाक दाखवून व दगडांनी हल्ला करून गुंडांनी पलायन केले असून त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सागर ढोणे व मंगेश खुळे अशी हल्ला करणाऱ्या संशयीतांची नावे आहेत. रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घणसोली डी मार्ट परिसरामध्ये आईस्क्रिम विक्रेत्यांना हे दोघेजण मारहाण करत होते. त्या ठिकाणी गर्दी जमली होती. बंदोबस्तावर असलेले रबाळे पोलीस स्टेशनचे कर्मचारी गणेश ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून मारहाण करणारांना अडविले.
परंतु सागर योन त्याच्याकडील चाकूने पोलीस शिपाई गणेश ढाकणे यांच्यावर वार केला. शेजारी असलेल्या सागर कांबळे याने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. पोलिसांच्या मदतीला आलेल्या इतर नागरिकांनाही या दोघांनी चाकूचा धाक दाखवून पुढे आलात तर बघून घेईल अशी धमकी दिली व जमावाच्या दिशेने दगड भिरकावून तेथून पलायन केले. या घटनेविषयी रबाळे पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.