नवी मुंबई : घरफोडी प्रकरणी कोपर खैरणे पोलिसांनी एका दांपत्याला अटक केली आहे. त्यात पोलिस कन्येचा समावेश असून गतमहिन्यात तिने प्रियकरासोबत लग्न केले आहे. दोघेही सुशिक्षित असून सोशल मीडियाद्वारे त्यांची ओळख झाली होती. मात्र मौज करण्यासाठी पैशाची चणचण भासू लागल्याने ते गुन्हेगारी मार्गाला लागले होते.
कोपर खैरणे परिसरात घडणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यांच्या अनुशंघाने पोलिसांकडून तपास सुरु होता. चोऱ्या, घरफोडी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात वेगवेगळ्या गुन्हेगारांचा सहभाग दिसून येत होता. त्यामुळे सीसीटीव्हीसह तांत्रिक तपासावर भर दिला जात होता. यासाठी वरिष्ठ निरीक्षक अजय भोसले, निरीक्षक गजानन कदम यांनी सहायक निरीक्षक दशरथ विटकर, सचिन भालेराव, विनोद कांबळे, किरण बुधवंत व संतोष पालवे आदींचे पथक केले होते. त्यांनी सखोल तपासाअंती दोघांना अटक केली आहे. श्रेयस जाधव (२६) व वैशाली जाधव (२१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून घरफोडीचा एक गुन्हा उघड झाला असून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उघड झालेल्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के असा २ लाख २२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
वैशाली हि पोलिसकन्या असून शिक्षण घेत आहे. तर श्रेयस सेल्समनची नोकरी करत होता. दोघांची सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर गतमहिन्यात त्यांनी कोर्ट मॅरेज केलेला आहे. दोघांनाही मौज मजा करण्याची सवय असल्याचे समजते. त्यासाठी पैशाची गरज असल्याने ते गुन्हेगारी मार्गाला लागल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कधीपासून गुन्हे करत होते याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.