मासळी मार्केट बनले जुगाराचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:23 AM2019-01-28T00:23:59+5:302019-01-28T00:24:18+5:30
तुर्भे स्टोअरमधील प्रकार; दोन वर्षांपासून मार्केट वापराविना पडून
नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथील मासळी मार्केट वापराविना पडून असल्याने ते जुगाराचा अड्डा बनले आहे. रात्री-अपरात्री त्या ठिकाणी गर्दुल्ल्यांच्या टोळ्या जमत आहेत. दोन वर्षांपासून हे मार्केट वापराविना पडून असल्याने ते मच्छीमारांसाठी खुले करण्याची मागणी होत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर येथे रस्त्यालगतची जागा फेरीवाल्यांनी व्यापली आहे, यामुळे रहदारीला अडथळा होत असून पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. परिणामी, त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्या ठिकाणी बसणारे मच्छीमार अनेक वर्षांपासून रस्त्यालगत व्यवसाय करत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या सूचनेनुसार तुर्भे स्टोअर येथे मासळी मार्केट बनवण्यात आले आहे. मात्र, मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरीही या मार्केटचा ताबा मच्छीमारांकडे देण्यात आलेला नाही. पालिका अधिकाºयांकडून तिथल्या जागावाटपाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याने अद्यापही मासळीविक्रेत्यांना रस्त्यालगतच बसावे लागत आहे. परिणामी, या मार्केटच्या जागेवर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी ताबा मिळवला आहे.
दिवस-रात्र त्या ठिकाणी जुगाराचे अड्डे चालत आहेत, तर रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी गर्दुल्ले एकत्र जमत असल्याने पालिकेच्या वास्तूचा गैरवापर होत असल्याची टीका शेकापचे नवी मुंबई कार्यालय चिटणीस गोविंद साळुंखे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पालिकेकडे तक्रार करून सदर मासळी मार्केटमधील ओटेवाटप करून मच्छीविक्रेत्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच वापराविना पडून असलेल्या मासळी मार्केटच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमून तिथल्या गैरप्रकारांना आळा घालावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.