नवी मुंबई : प्रभाग समिती, स्मार्ट सिटीनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या कारभाराला शासनाने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीच्या मागणीवरून आयोजित केलेली विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली आहे. यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीची उत्सुकता वाढली असून काँगे्रसचे एक मत निर्णायक ठरणार आहे. महानगरपालिकेमधील राष्ट्रवादी काँगे्रसच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. स्थायी समिती निवडणूक दोन दिवसांवर आली असताना दिघा येथील नगरसेविका अपर्णा गवते यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे ६, काँगे्रस व भाजपाचा प्रत्येकी एक व राष्ट्रवादी काँगे्रसचे ८ सदस्य होते. परंतु गवते यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीकडे आता सातच सदस्य आहेत. सभापतीपद राखण्यासाठी कसरत करावी लागू नये, यामुळे सत्ताधाऱ्यांनी तातडीने विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याची मागणी केली होती. सचिव चित्रा बाविस्कर यांनीही तातडीने विशेष सभेची जाहिरात प्रसिद्ध केली. ९ मे रोजी सकाळी एक सदस्याची निवड करण्यासाठी सभा आयोजित केली असल्याचे पत्र ६ तारखेला पहाटे ३ व ४ वाजता नगरसेवकांच्या घरी पाठविण्यात आले. एवढ्या उशिरा पत्र दिलेच कसे, अशी विचारणा होऊ लागली होती. शिवसेना व भाजपा नगरसेवक या विरोधात शासनाकडे तक्रार करणार होते. परंतु शासनाने ७ मे रोजी महापालिकेने आयोजित केलेली सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका सचिवांनी एक सदस्य नियुक्त करण्यासाठी बोलावण्यात आलेली ९ मे रोजीची सभा व त्यासाठी ५ मे रोजी निर्गमित केलली सूचना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४५१ मधील तरतुदीनुसार शासनास असलेल्या अधिकारात निलंबित करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाच्या निर्णयामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसची कोंडी झाली आहे. यापूर्वी प्रभाग समितीच्या रचनेला शासनाने स्थगिती दिली आहे. यानंतर स्मार्ट सिटीविषयी पालिकेने मंजूर केलेला प्रस्ताव निलंबित केला होता. यानंतर तिसऱ्यांना सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का मिळाला आहे. याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटणार आहे. राष्ट्रवादी व काँगे्रसकडे एकूण ८ संख्याबळ आहे. शिवसेना-भाजपाकडे ७ सदस्य आहेत. परंतु काँगे्रसचे मत फुटले तर सभापती निवडीवर परिणाम होणार असून, निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसने काढला व्हिपकाँगे्रस पक्षाने त्यांच्या सदस्या मीरा पाटील यांना व्हिप काढला असून, आघाडीचे उमेदवार जे. डी. सुतार यांना मत देण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. परंतु या सदस्या माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांचा प्रभाव असलेल्या प्रभागातून निवडून आल्या आहेत. शेट्टी यांनी यापूर्वी विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मदत केली होती. यामुळे पुन्हा काही चमत्कार घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाच अर्ज दाखलस्थायी समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँगे्रसच्या जयवंत सुतार यांनी दोन अर्ज भरले आहेत. शिवसेनेच्यावतीने शिवराम पाटील यांनीही दोन अर्ज भरले असून, भाजपाच्या दीपक पवार यांनीही अर्ज भरला आहे. पाच अर्ज असले तरी लढत जयवंत सुतार विरोधात शिवराम पाटील अशीच होणार आहे. राष्ट्रवादी वर्चस्व सिद्ध करण्यासाठी व शिवसेना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसला शासनाचा पुन्हा धक्का
By admin | Published: May 08, 2016 3:00 AM