नवी मुंबई : सीबीडीमधील सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स या विविध शासकीय कार्यालये असलेल्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून दुरुस्तीचे काम हाती घेतले असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे काम संथगतीने सुरु आहे. वेळीच डागडुजी न केल्याने या ठिकाणी येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या कामाचा अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी आयकर विभाग, वृत्तपत्र संपादन कार्यालय, कोर्ट असे विविध शासकीय कार्यालय आहेत. भिंतीमधून लोखंडी सळ््या बाहेर पडलेल्या दिसून येत आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी ठेकेदाराचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याची तक्रार केली. या ठिकाणी सुरु असलेल्या कामामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साठला असून त्यामुळे दुुर्गंधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकांनी या इमारतीच्या वाईट अवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. या ठिकाणी जर एखादा जीवघेणा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण, असाही प्रश्न या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विचारला. काम पूर्ण होईल प्रतीक्षेत महिने उलटले तरी कामाला गती आलेली नाही. (प्रतिनिधी)सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स या इमारतीची दुरवस्था पाहता या इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. इमारतीचा बराचसा भाग धोकादायक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम गांभीर्याने घेऊन ठेकेदारांना विशिष्ट कालावधीत ते काम पूर्ण करण्याचा आग्रह धरला पाहिजे. - सुरेश शिंदे, सदस्य, नियंत्रण दक्षता समिती, ठाणे जिल्हा
शासकीय इमारतीची दुरवस्था
By admin | Published: August 28, 2015 12:01 AM