शासनाच्या तिजोरीत पडणार ६५ लाखांची भर, पोलिस बंदोबस्तामधून मिळणार शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:05 IST2025-01-18T09:47:39+5:302025-01-18T10:05:11+5:30
कार्यक्रमासाठी ८०० ते हजार पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार आहे.

शासनाच्या तिजोरीत पडणार ६५ लाखांची भर, पोलिस बंदोबस्तामधून मिळणार शुल्क
नवी मुंबई : नेरूळमध्ये होणार असलेल्या कोल्ड प्ले आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत ६० ते ६५ लाखांची भर पडणार आहे. कार्यक्रमासाठी ८०० ते हजार पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार आहे. हा बंदोबस्त सशुल्क असल्याने त्या माध्यमातून शासनाला हे शुल्क मिळणार आहे.
नेरूळ येथे डी. वाय. पाटील स्टेडियमवर १८, १९ व २१ जानेवारीला ‘कोल्ड प्ले’ या आंतरराष्ट्रीय बँडचा आवाज घुमणार आहे. बँडचा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासाठी शौकिनांचे नवी मुंबईला पाय लागणार आहेत. त्यात देशभरातील तसेच देशाबाहेरून येणाऱ्यांचीही संख्या मोठी असणार आहे. पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याचाही ताण राहणार आहे. त्याशिवाय सर्व प्रकारच्या आपत्कालीन यंत्रणादेखील सज्ज ठेवल्या जाणार आहेत.
खासगी कार्यक्रम
गर्दी नियंत्रित राखण्यासह तिकिटांचा काळाबाजार रोखणे, चोरट्यांना आवर घालणे, वाहतूक सुरळीत राखणे, अशा अनेक प्रसंगांना पुढील तीन दिवस पोलिसांना सामोरे जावे लागणार आहे. तर होणारा कार्यक्रम खासगी असल्याने त्यासाठी पुरवला जाणारा पोलिस बंदोबस्त हा सशुल्क असणार आहे.
प्रतिदिन ५० हजार प्रेक्षक
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रतिदिन ५० हजारांच्या जवळपास शौकिनांची वर्णी लागणार आहे. त्यात काही मंत्री, त्यांचे कुटुंबीय तसेच गर्भश्रीमंतांची मुलेदेखील असणार आहेत. ५० हजार ते अडीच, तीन लाखांना तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.