मुंबई : शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी बालरक्षक ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने बालरक्षकांच्या मार्गदर्शनासाठी प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले. मात्र केवळ सरकारशी जमत नाही म्हणून काही शिक्षणतज्ज्ञांना मार्गदर्शक यादीतून विद्या प्राधिकरणाने वगळल्याचा प्रकार शिक्षण विभागात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात अशी असहिष्णुता का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना या प्रकाराबाबत पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
राज्याच्या शिक्षण विभागासमोर शाळाबाह्य मुलांचा प्रश्न हा महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून बालरक्षकांची योजना आखण्यात आली आहे. त्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची एक समितीही तयार करण्यात आली. ज्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे नावही होते. मात्र शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबाबत हेरंब कुलकर्णी यांनी याआधीही प्रश्न मांडून सरकारवर टीका केली होती. या कारणाने ऐनवेळी त्यांचे नाव मार्गदर्शक यादीतून कमी करण्यात आल्याची माहिती त्यांना मंत्रालयातून मिळाली. शाळाबाह्य सर्वेक्षण विषयावर मी सतत टीका केली ते लक्षात ठेवून टीका करणाऱ्यांना बोलवायचे नाही अशी ही मानसिकता लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया हेरंब कुलकर्णी यांनी दिली. मतभेद असणाºया व्यक्तींना शिक्षण विभागात कसे दूर ठेवले जाते याचे हे उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.चौकशीची मागणीच्यानिमित्ताने शिक्षणक्षेत्रात असहिष्णुता कधीपासून सुरू झाली, अशी चर्चा शिक्षणतज्ज्ञच करीत आहेत. यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र पाठवून या प्रकाराची चौकशी करावी, अशी विनंती केली आहे. यावर विनोद तावडे यांनी उत्तर देऊन याची चौकशी करतो व आपल्या बाबतीत असहिष्णुता हा मुद्दा नाही, असे उत्तर दिले.