नवी मुंबई : महापालिकेच्या ९ शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून शासनाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या ९ विविध शाळांना १ ली ते १० वी, ९ वी ते १० वी आणि ११ वी ते १२ वी च्या शैक्षणिक वर्गासाठी परवानगी दिली आहे. यामुळे परवानगीविना सुरु असलेल्या महापालिकेच्या काही शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील कोणत्याही भागातील विद्यार्थ्यां शिक्षणापासून वंचित राही नयेत यासाठी माजी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महापालिकेने शहरात विविध ठिकाणी शाळा सुरु केल्या होत्या. या शाळांच्या मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर शाळांना परवानगी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मागील काही वर्षांपासून या शाळा विनापरवानगी सुरु असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता शासनाने याबाबत निर्णय घेतला असून स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर महापालिकेच्या तब्बल ९ शाळांना मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यमंडळाच्या दिवा येथील इंग्रजी माध्यमाच्या, कोपरखैरणेगाव येथील मराठी माध्यमाच्या, अडवली भुतवली येथील मराठी माध्यमाच्या आणि तुर्भे स्टोअर येथील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना जोडून माध्यमिक शाळेसाठी परवानगी देण्यात आली आहे.
तीन सीबीएसई मंडळाच्या शाळा
महापालिकेच्या माध्यमातून शहरात सीवूड आणि कोपरखैरणे विभागात सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरु आहेत. या शाळांना मिळणार प्रतिसाद आणि पालकांच्या मागणीनुसार माजी लोकप्रतिनिधींनी देखील महापालिकेकडे सीबीएसई शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. महापालिका प्रशासनाने याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. शासनाने वाशी सेक्टर १५, १६, कोपरखैरणे सेक्टर ४ आणि सारसोळे येथील शाळेत प्राथमिक ते माध्यमिक सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
दोन उच्च माध्यमिक शाळा
महापालिकेच्या सर्व शाळा १ ली ते १० पर्यंत आहेत. त्यामुळे अनेकवेळा आर्थिकदृष्टया कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांना दहावी नंतर शिक्षणापासून दूर राहावे लागते. यासाठी उच्च माध्यमिक (११ वी आणि १२ वी) चे शिक्षण सुरु करण्याची मागणी माजी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने शासनाकडे केली होती. त्यानुसार कातकरीपाडा येथील इंगजी, मराठी आणि हिंदी माध्यमाच्या माध्यमिक शाळेला जोडून उच्च माध्यमिक आणि कुकशेत येथील इंग्रजी माध्यमाच्या उच्च प्राथमिक शाळेला जोडून उच्च माध्यमिकच्या सर्व शाखांना परवानगी दिली आहे.