नवी मुंबईच्या स्वच्छतेसह सौंदर्यावर शासनाची मोहर; क वर्ग गटात राज्यात पहिला क्रमांक
By नामदेव मोरे | Published: April 20, 2023 07:00 PM2023-04-20T19:00:02+5:302023-04-20T19:00:22+5:30
नवी मुंबई : राज्य शासनाच्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम ...
नवी मुंबई : राज्य शासनाच्या शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनानिमीत्त आयोजीत कार्यक्रमात महानगरपालिकेला १५ कोटीचा धनादेश देण्यात आला. स्वच्छता अभियानामध्ये महानगरपालिकेची कामगिरी सातत्याने उंचावत असून शहरात राबविण्यात आलेले प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर पथदर्शी ठरू लागले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देशात तीसरा व राज्यात पहिला क्रमांक मिळविला होता. २०२३ मध्ये देशात पहिला क्रमांक मिळविण्याचे उद्दीष्ट निश्चीत करुन अभियान राबविले जात आहे. शासनाने आयोजीत केलेल्या स्पर्धेमध्ये क वर्ग महानगरपालिका गटात पहिला क्रमांक मिळविला असून मुंबईमधील एनसीपीए सभागृहात मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला. महानगरपालिकेने झोपडपट्टी, गावठाणासह सिडको विकसीत विभागामध्येही प्रभावीपणे स्वच्छता अभियान राबविले आहे. सामाजीक संघटना, विद्यार्थी, नागरिक, लोकप्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने नियमीत श्रमदान मोहिमांचे आयोजन केले जात आहे.
घनकचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अद्ययावत केली असून कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मीती केली जात आहे. मोकळ्या भूखंडांवरील कचरा साफ करून त्यांचे सुशोभीकरण केले आहे. उड्डाणपुलाखाली दोन ठिकाणी मैदान तयार केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, रचना संसद अशा नामांकित कला महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शहरातील भिंती, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, शाळा व इतर इमारतींच्या भिंती रंगविण्यात आल्या असून आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. महत्वाच्या ठिकाणी संतांचे अभंग, कवितांच्या ओळी रेखाटण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक नागरिक येथील स्वच्छता व सौंदर्य पाहून प्रभावीत होऊ लागला आहे. महानगरपालिकेने राबविलेल्या या उपक्रमांची दखल शासनाने घेतली असून क वर्ग गटात मनपाला पहिला क्रमांक मिळाला आहे. १५ कोटी रुपयांचा धनादेश स्विकारताना आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घरनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
स्वच्छतेप्रमाणे शहर सुशोभीकरणावर नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे. सुशोभीकरणासाठी अभिवन संकल्पना राबविण्यात आल्या आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येकाला येथील सौंदर्य दृष्टीस पडत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे कोतुक केले.
सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालेला पुरस्कार प्रत्येक अभियानात सक्रीय सहभाग घेणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांना समर्पीत आहे. कोणताही पुरस्कार हा चांगले काम केल्याबद्दल प्रोत्साहीत करणारा असून अधिक चांगले काम करण्याची जबाबदारी वाढविणारा असतो. यापुढील काळातही निश्चय केला नंबर पहिला हे ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले जाईल. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका
- नवी मुंबई महानगरपालिकेने राबविलले स्वच्छता उपक्रम
- इमारतींच्या संरक्षण भिंती, उड्डाणपुलांवर आकर्षक चित्रांचे रेखाटन.
- उड्डाणपुलाखालील कचरा साफ करून मैदानाची निर्मीती व सुशोभीकरण.
- शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये टाकाऊपासून आकर्षक शिल्पांची उभारणी.
- विद्यार्थ्यांसाठी ड्राय वेस्ट बॅंक संकल्पनेची अंमलबजावणी.
- घनकचरा व्यवस्थापनासाठी अधुनीक तंत्राचा वापर.
- ओल्या कचऱ्यापासून खत निर्मीती, बांधकाम साहित्यावरही प्रक्रिया सुरु.
- मोकळे भूखंड स्वच्छ करून हरीत पट्यांचा विकास