सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दादरचा बॉम्ब निकामी करणारे जवान अद्यापही केंद्र व राज्य सरकारपासून दुर्लक्षित आहेत. स्कूटरमध्ये ठेवलेला १२ किलो आरडीएक्सचा बॉम्ब निकामी करून त्यांनी दादरमधील शेकडो जीव वाचवले होते. मात्र त्यांच्या शिफारशीवरून सहा अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देणाऱ्या सरकारने त्यांनाच उपेक्षित ठेवले आहे.१२ मार्चला १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी मुंबईत सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते व त्यानंतरही अनेक दिवस संशयास्पद वस्तू आढळत होत्या. याचदरम्यान १४ मार्चला दादर येथे उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये १२ किलो आरडीएक्स आढळून आले होते.
दहशतवाद्यांनी मुंबईत पेरलेल्या बॉम्बपैकी तो तेरावा बॉम्ब होता. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी मुंबई विमानतळाच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाला बोलावण्यात आले होते. यावेळी पथकाचे प्रमुख मेजर वसंत जाधव यांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर हा बॉम्ब निकामी करून परिसरातल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवले होते. यावेळी नागरिकांनी अक्षरश: त्यांना खांद्यावर उचलून घेतले होते. या साखळी बॉम्बस्फोटातील पहिला बॉम्ब वरळी येथे आढळला होता. परंतु तो निकामी करण्यासाठी जाधव यांचे पथक जात असतानाच त्याचा भीषण स्फोट झाला. यात जाधव व त्यांचे सहकारी जखमी झाले असता काही क्षणातच मुंबईत इतर ठिकाणीदेखील बॉम्बचे धमाके झाले. यामुळे विमानतळाची सुरक्षा महत्त्वाची असल्याने ते पथकासह परत विमानतळाकडे येत होते. दरम्यान, गजबजलेल्या कोळीवाडा येथे रस्त्यावरच एक हॅन्ड ग्रॅनाईट फेकला असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी त्यांनी क्षणाची विलंब न लावता तो हॅन्ड ग्रॅनाईट त्या ठिकाणावरून माहीम समुद्रकिनारी नेऊन निकामी केला. सैन्यातून निवृत्त होऊन विमानतळाच्या बॉम्बशोधक पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतलेल्या मेजर जाधव यांच्या या दोन्ही कामगिरीमुळे जीवितहानी टळली.
मेजर जाधव यांच्या शिफारशीवरून त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा राज्य व केंद्र सरकारने योग्य तो सन्मान केला. त्यांना केंद्र व त्यांच्या राज्याने आजीवन पेन्शन सुरू केली आहे. मात्र जाधव यांची दखल ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने घेतली. घटनेच्या २८ वर्षांनंतरदेखील ते राज्य व केंद्र सरकारकडून योग्य सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्याने केले दुर्लक्ष
१२ मार्च १९९३ ला मुंबईत स्फोट होऊ लागले असता आमच्या पथकाने मुंबईच्या मदतीसाठी धाव घेतली होती. किमान तीन महिने ठिकठिकाणी आढळणाऱ्या बॉम्बसदृश वस्तू व बॉम्ब निकामी केले. परंतु सहा आठवडे आगोदरच सैन्यातून निवृत्त झालो असल्याने ना सैन्याने कार्याची दखल घेतली. तर केंद्राच्या सूचनेवरून राज्याच्या मदतीला धावूनही केंद्राने दखल घेतली नाही. तर पोलीस दलाचा घटक नसल्याने राज्याने दुर्लक्षित केले. - मेजर वसंत जाधव (निवृत्त)