नवी मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे गोविंदा सुखावला आहे. मंगळवारी ठिकठिकाणी रचल्या जाणाºया हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात गोविंदांकडून मानवी मनोरे रचले जाणार असून पावसाच्या सरींमुळे टँकरद्वारे पाण्याचा फवारा करण्याची वेळ आयोजकांवरील टळण्याची शक्यता आहे.काही वर्षांपासून पर्यावरणात झालेल्या बदलामुळे ऐन दहीहंडीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतलेली असते. यामुळे लाखमोलाच्या हंड्या फोडण्याच्या प्रयत्नात एका शहरातून दुसºया शहरात फिरणाºया गोविंदा पथकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय हंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले जात असताना थरारक प्रसंग निर्माण करण्यासाठी दहीहंडी आयोजकांकडून गोविंदा पथकांवर टँकरद्वारे पाण्याचा मारा केला जातो. यामुळे प्रतिवर्षी दहीहंडीच्या दिवशी लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असते. परंतु गतवर्षी राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या दुष्काळाचे भान राखून अनेक आयोजकांनी पाण्याचा अपव्यय टाळला होता. यामुळे पाण्याची बचत होत असली तरी गोविंदांकडून मात्र नाराजी व्यक्त केली जात होती. यंदाही पाण्याअभावी गोविंदा नाराज होण्याची शक्यता होती. मात्र ऐन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने गोविंदांसह दहीहंडी आयोजक देखील सुखावला आहे. पावसाचा असाच जोर दुसºया दिवसापर्यंत राहिल्यास दहीहंडीच्या दिवशी तापमान काही अंशाने कमी होवून गोविंंदांचा थकवा कमी होण्यास मदत होणार आहे. तर अनेक आयोजकांनी ठरवलेले पाण्याचे टँकर देखील रातोरात रद्द केले आहेत.सोमवारी सकाळपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत होते. जोराच्या वाºयामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे देखील प्रकार घडले. मात्र यामध्ये कोणती गंभीर दुर्घटना घडलेली नाही.अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळी ८.५० वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० पर्यंत ३१.९२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.बेलापूर विभागात १५.०४ मि.मी., नेरुळ विभागात ३५.०६ मि.मी., वाशी विभागात २७.०७ तर ऐरोली विभागात ४९.०० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आपत्कालीन विभागात झाली आहे.पाऊस सुरू झाल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवातही अधूनमधून पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
पावसाच्या पुनरागमनामुळे गोविंदा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 2:14 AM