सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे; जनसंपर्क विभागाच्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 10:37 AM2022-09-05T10:37:19+5:302022-09-05T10:38:31+5:30
सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. या गृहप्रकल्पांत विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात.
नवी मुंबई : सिडकोच्या गृहप्रकल्पात पत्रकारांना घर घेण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. यापुढे सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील पत्रकार प्रवर्गातील घरासाठी अर्ज करताना राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. याबाबतची अट राज्य सरकारने शिथिल केली असून, तसे निर्देश सिडकोला दिले आहेत. राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार यापुढे सिडको महामंडळाकडूनच योग्य ती शहानिशा करून पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे अनेक पत्रकारांना आता सिडकोचे घर घेणे सुकर झाले आहे.
सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करून दिली जातात. या गृहप्रकल्पांत विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. यापूर्वी पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना संबंधित पत्रकाराला सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. ही प्रक्रिया वेळकाढूपणाची असल्याने हे पात्रता प्रमाणपत्र मिळविताना संबधित पत्रकारांची कसरत होत होती. यातील जाचक अटींमुळे संबंधित पत्रकाराला हे प्रमाणपत्र नाकारले जाते, परिणामी अनेक पत्रकारांना घराच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पत्रकारांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सिडकोला काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यापुढे गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या पत्रकार अर्जदारांची पात्रता सिडकोकडूनच निश्चित केली जाणार असल्याने पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.