ग्रामपंचायत निवडणुकांचा नवी मुंबईत प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:35 AM2021-01-13T01:35:32+5:302021-01-13T01:35:41+5:30
चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन : घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेणे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विधानसभा व लोकसभा निवडणुकीप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीलाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे सातारा, अहमदनगर व इतर अनेक जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचे उमेदवार मुंबई, नवी मुंबईत येऊन ग्रामस्थांच्या भेटी घेऊ लागले आहे. मतदानासाठी गावी येण्याचे आवाहन केले जात असून वाहन व्यवस्थेचीही सुविधा केलीआहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील तब्बल १४ हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. अनेक गावांमध्ये निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांमधील मूळ गावातील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत आले आहेत. अनेक गावांमधील ५० टक्केपेक्षा जास्त मतदार मुंबई व नवी मुंबई परिसरात आहेत. यामुळे ग्रामपंचायत उमेदवारांनी प्रचारासाठी येथे तळ ठोकला आहे. घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली जात आहे. गावाच्या विकासासाठी मतदानाला गावी यावे, असे आवाहन केले जात आहे. अनेक ग्रामस्थांच्या गावकीच्या सामूहिक रूम असून त्या ठिकाणी बैठकाही घेतल्या जात आहेत. गावातील यात्रेपासून सर्व कामांमध्ये मुंबईकरांची भूमिका महत्त्वाची असते. विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांसाठी खास बसेसची सुविधाही केली जाते. प्रथमच ग्रामपंचायतीसाठी चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे उमेदवार रविवारपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यांनी ठाणे, मीरा-भाईंदर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांना गावी येण्याचे आवाहन केले. अहमदनगर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या उमेदवारांचाही नवी मुंबई, पनवेल परिसरात प्रचार सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये २० ते ४० वर्षांत पहिल्यांदा निवडणूक होत आहे. यामुळे तेथील निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. यामुळे मुंबईमध्ये येऊन प्रत्येक ग्रामस्थांच्या भेटी घेत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.
मीडियाही मुंबईकरांकडे
निवडणुकांसाठी सोशल मीडियावरूनही मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. गावातील मुंबई, नवी मुंबईत राहणारे तरुण सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत असल्याचेही पाहावयास मिळत आहे. यामुळे विधानसभा व लोकसभेप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही प्रचाराचा धुरळा उडाला आहे.
वाहनांचीही सुविधा
ग्रामपंचायतीच्या मतदानासाटी जाता यावे यासाठी अनेक गावांतील नागरिकांनी बस बुकिंग केले आहे. सर्वांना वेळेत गावी जाता यावे व एक दिवसात पुन्हा मुंबई, नवी मुंबईत येता यावे यासाठी स्वेच्छेने वाहनांची बुकिंग केल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे.
गावाच्या विकासामध्ये मुंबईत राहणाऱ्या नागरिकांचेही मोठे योगदान असते. अनेक चाकरमान्यांची मतदार यादीमध्ये नावे आहेत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी घरोघरी जाऊन त्यांना मतदानासाठी येण्याचे आवाहन आम्ही केले आहे.
- योगेश जांभळे, ग्रामस्थ,
जांभळमुरे, सातारा