नवी मुंबई : वाशी येथे ९वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन भरविण्यात आले आहे. राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर हे आहेत. या दोन दिवसीय संमेलनाची रविवारी सांगता होणार आहे.गझल सागर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या संमेलनाला सिडको तसेच मोहिनी आर्ट्स अकादमी यांचे सहकार्य लाभले आहे. वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हे संमेलन भरविण्यात आले आहे. या संमेलनाला खास परदेशातूनही गझलप्रेमींनी हजेरी लावली. अमेरिकेहून आलेल्या अपर्णा पाध्ये, तसेच लंडनहून आलेले रवींद्र लगादे यांचा या ठिकाणी विशेष सत्कार करण्यात आला. नवनवीन गझलकार तयार होत असून, या माध्यमातून भावना व्यक्त केल्या जात आहेत.मराठी गझलविषयी जाणून घेता यावे, याकरिता अशा संमेलनाची आवश्यकता असल्याचे मत संमेलनाचे अध्यक्ष मधुसूदन नानिवडेकर यांनी व्यक्त केले. तर संमेलनाच्या माध्यमातून गझलचे जाळे सर्वदूर पसरवित हे वर्तूळ नवी मुंबईत पूर्ण होत असल्याचे समाधान गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय गझल संमेलनाचा शानदार शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:03 AM