नवी मुंबई : मुंबईनंतरच्या दुसऱ्या भव्य विपश्यना केंद्राचे काम बेलापुरमधील पारसिक हिलवर सुरु आहे. २००५ सालापासून या केंद्राच्या कामाला सुरवात झाली असून सद्यस्थितीला दुसऱ्या टप्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी उभारला जाणारा भव्य पागोडा शहराच्या नाविन्यात भर टाकणार आहे.भगवान गौतम बुध्दांनी सुमारे २५०० वर्षापूर्वी विपश्यना साधनेद्वारे स्वत:च्या मनावर ताबा मिळवला होता. तेव्हापासून या प्राचीन अध्यात्मिक कलेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मनावर कशा प्रकारे ताबा मिळवावा, हे या अध्यात्मिक विद्येत शिकवले जाते. त्याकरिता राज्यासह देशभरात ठिकठिकाणी विपश्यना केंद्र चालवले जात आहेत. त्यापैकीच एक केंद्र मुंबईतील गोराई येथे सुरु आहे. त्यानंतरचे मुंबई लगतच नवी मुंबईतले दुसरे केंद्र बेलापूरच्या पारसिक हिलवर उभारले जात आहे. विशेष म्हणजे ज्यांनी त्याठिकाणी अध्यात्मिक विद्या प्राप्त केली आहे, त्यांनी स्वेच्छेने दिलेल्या निधीतूनच हे काम पुर्णत्वास नेले जात आहे.सुमारे तीन एकरच्या जागेत हे धम्म विपुला विपश्यना केंद्र बांधले जात आहे. छतावर सुमारे सव्वाशे फुट उंचीचा भव्य डोम बसविण्यात येणार आहे. सद्यस्थितीला देखिल या केंद्रामध्ये विपश्यनेचे दहा दिवसाचे वर्ग सुरु आहेत. त्यानुसार शंभरहून अधिक प्रशिक्षणार्थींच्या बैठकीची व्यवस्था या केंद्रात उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्याशिवाय १३० जणांच्या क्षमतेचे वैयक्तीक साधनेचा कक्षही बनवला जात आहे.स्पर्धात्मक युगात सततच्या धावपळीमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ बिघडत चालले आहे. अशावेळी मनशांती मिळवायची असल्यास विपश्यना साधना अत्यंत महत्वाची आहे. त्यामध्ये कस जगायच, कस वागायच याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच या विद्येचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हिच संधी नवी मुंबईसह लगतच्या शहरातील नागरिकांना पारसिक हिलवरील केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. पारसिक हिलवरील निसर्गाच्या सानिध्यात साकारत असलेला भव्य डोम ठाणे बेलापूर मार्गावरील बेलापूर खिंडीतून जाताना सहज दृष्टीस पडतो. (प्रतिनिधी)
बेलापूरमध्ये साकारतेय भव्य विपश्यना केंद्र
By admin | Published: January 23, 2017 5:51 AM