गोल्फ कोर्सवरील गवत सुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 02:03 AM2019-06-11T02:03:41+5:302019-06-11T02:04:12+5:30

सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष : परिसरामध्ये वाढला गुरांचा वावर

The grass on the golf course dried up | गोल्फ कोर्सवरील गवत सुकले

गोल्फ कोर्सवरील गवत सुकले

Next

वैभव गायकर

पनवेल : खारघर सेक्टर-२२ मध्ये सिडकोने आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स प्रकल्प उभारला आहे. श्रीमंतांचा खेळ म्हणून गोल्फ या खेळाला ओळख असताना सिडकोने खारघर शहरातील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हा प्रकल्प उभारला आहे. ५० कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या या गोल्फ कोर्सच्या देखभालीकडे सिडकोचे सध्या दुर्लक्ष होताना दिसते. येथील गवत सुकले असून गोल्फ कोर्समध्ये चक्क गुरांचा वावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गोल्फ कोर्सच्या देखरेखीसाठी सिडकोकडून वर्षाला पाच कोटींचा खर्च केला जातो. यात परिसर स्वच्छता, गवताची देखभाल, सुरक्षा आदींचा समावेश आहे. मात्र सध्या याठिकाणचे गवत पूर्णपणे सुकले आहे. त्यामुळे पनवेल शहरातील अनेक ठिकाणांप्रमाणे याठिकाणीही पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याठिकाणी नेमलेले सुरक्षारक्षक सर्वसामान्य नागरिकाला प्रवेशद्वाराजवळ थांबू देत नाहीत. मात्र याठिकाणी गाई-गुरांचा मुक्त संचार दिसतो. त्यामुळे केवळ दिखाव्यासाठी सिडकोने हा प्रकल्प उभारला आहे? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. १०३ हेक्टरमधील या प्रकल्पात सुरुवातीला १८ होलचे उभारले जाणार होते. मात्र वनविभागाच्या अडथळ्यामुळे सध्याच्या घडीला केवळ ९ होलच या प्रकल्पात आहेत. अनेक वर्षांपासून वनविभागाच्या विविध परवानग्यांमध्ये या प्रकल्पाचा दुसरा टप्पा रखडला आहे. गोल्फ कोर्सचा सध्याचा परिसर सुमारे १०३ हेक्टरचा असल्याने सिडको या जागेतच दुसरा टप्पा सामावला आहे. गोल्फ खेळण्यासाठी सुमारे प्रतिदिन ८०० ते १२०० रुपये खर्च येतो. तसेच खेळाडूंच्या मागणीनुसार ट्रॉली, गाडी तसेच खेळोपयोगी सामान खेळाडूंना दिले जाते. प्रकल्प पूर्णत्वाला आला नसल्याने या ठिकाणी अद्याप एकही आंतरराष्ट्रीय किंवा मोठी स्पर्धा खेळविली गेली नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धांचे याठिकाणी आयोजित केल्या जातील.

सध्याच्या घडीला या प्रकल्पाच्या देखरेखीचे काम चेन्नईस्थित आयपीआय या कंपनीला देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर रोजी येथील क्लब हाऊस मध्ये वादग्रस्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्रास येथील गवतावर टेबल मांडून पार्ट्यांचा जल्लोष करण्यात आला होता. या प्रकरणी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी चौकशीचे आदेश सिडकोच्या दक्षता विभागाला दिले होते.
 

Web Title: The grass on the golf course dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.