विकासाच्या प्रत्येक कामावर करडी नजर, २५०० कामांची संगणकीय यादी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:36 AM2017-12-15T02:36:57+5:302017-12-15T02:37:04+5:30
शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक कामावर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. अनावश्यक खर्चावर निर्बंध घातले आहेत. प्रत्येक प्रस्तावास मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी भेट देण्यास सुरवात केली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : शहरात सद्यस्थितीमध्ये सुरू असलेल्या व भविष्यात मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रत्येक कामावर आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी करडी नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. अनावश्यक खर्चावर निर्बंध घातले आहेत. प्रत्येक प्रस्तावास मंजुरी देण्यापूर्वी घटनास्थळी भेट देण्यास सुरवात केली आहे. विकासकामे वेळेत व्हावी यासाठी २५०० कामांची संगणकीय यादी तयार केली असून, नियमितपणे त्यांचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे.
घणसोली सेक्टर ७ मधील महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे वृत्त काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. वृत्त वाचताच आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शाळेला अचानक भेट दिली. शाळा दोन सत्रामध्ये सुरू करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. शिक्षक वेळेत येवू लागले व खासगी संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे संगणकीकरण करण्यात आले आहे. आयुक्तांनी एका शाळेच्या प्रश्नाचीही दखल घेतल्यामुळे पालकांसह शिक्षकांनीही कौतुक केले होते. घणसोली शाळेप्रमाणेच शहरातील इतर प्रश्न व विकासकामे आयुक्तांनी याच पद्धतीने मार्गी लावण्यास सुरवात केली आहे. पदभार स्वीकारल्यापासून आलेला प्रत्येक प्रस्ताव तपासला जात आहे. प्रस्तावांना मंजुरी देण्यापूर्वी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली जात आहे. आतापर्यंत सर्व १११ प्रभागांना भेटी देऊन तेथील परिस्थिती समजून घेतली आहे. कोणालाही माहिती न देता संबंधित अभियंते व आवश्यक अधिकाºयांना घेऊन घटनास्थळी पाहणी केली जाते. कामांची गरज असल्यास त्याच ठिकाणी फाईलवर सही केली जात आहे. कामाची आवश्यकता नाही असे सांगितल्यास तत्काळ नकार दिला जात आहे.
फक्त पैसे खर्च करण्यासाठी कामे काढू नका. शहरवासीयांना आवश्यकता असेल त्याच कामांचे नियोजन करा अशा सूचनाही अधिकाºयांना दिल्या आहेत. शहरात प्रत्यक्ष सुरू असलेल्या व करण्यात येणाºया २५०० कामांची यादी तयार करण्यात आली आहे. संगणकावर सर्व प्रस्ताव, त्यांचा कार्यादेश, निविदा प्रक्रियेपासून काम कोणत्या स्थितीमध्ये आहे याची नोंद ठेवण्यात आली आहे. शहर अभियंता व संबंधित अधिकाºयांकडून प्रत्येक आठवड्याला या कामांचा आढावा घेतला जात असून त्यांच्यानंतर सर्व कामांवर स्वत: आयुक्त लक्ष देत आहेत. जी कामे सुरू आहेत ती वेळेत व चांगल्या दर्जाची होवू द्या. कामे वेळेतच झाली पाहिलेत. विलंब झाल्यास त्याविषयी योग्य स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केल्या आहेत. विलंब करणाºया ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. आयुक्त अचानक कार्यालयास भेट देत असल्यामुळे अधिकारीही सतर्क झाले आहेत.
प्रत्येक कार्यालयास भेट
आयुक्तांनी महापालिकेच्या प्रत्येक कार्यालयांना अचानक भेट देण्यास सुरवात केली आहे. नुकतीच परिवहनच्या मुख्यालयास भेट देवून तीन वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेतला. कामकाज सुधारा नाहीतर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. याच धर्तीवर इतर कार्यालयांना भेटी दिल्या जात आहे. सर्वांना संधी दिली असून भविष्यात कामात हलगर्जी आढळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
२ हजार कोटींच्या ठेवी
महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असून सद्यस्थितीमध्ये २ हजार कोटी रूपयांच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जनतेच्या पैशाचा योग्य वापर केला पाहिजे. फक्त पैसे खर्च करण्यासाठी कामे केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
योग्य कामांचे स्वागत
प्रशासनाने लोकप्रतिनिधींसह सर्वांचाच योग्य आदर करण्यास सुरवात केली आहे. योग्य कामांना तत्काळ मंजूरी दिली जाणार पण अनावश्यक कामे कोणत्याही स्थितीमध्ये न करण्याचे धोरण अंगिकारले असून आदर करताना दबावाखाली कामे केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आयुक्तांच्या कार्यशैलीवर एक गट नाराज
आयुक्तांच्या प्रत्येक कामाची घटनास्थळी जावून पाहणी करण्याच्या धोरणावर लोकप्रतिनिधी व प्रशासनातीलही एक गट नाराज आहे. आयुक्तांचा इतर अधिकाºयांवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी जाण्यामुळे वेळ वाया जात असल्याचीही टीका होवू लागली आहे. विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित असल्याचा आरोपही होवू लागला आहे. परंतु आयुक्तांनी मात्र याकडे दुर्लक्ष करून कामांची स्वत: खात्री करून घेण्याचेच धोरण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.