मुंबई-गोवा महामार्गावर चोख पोलीस बंदोबस्त; रुग्णवाहिका, क्रेनची विशेष व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:28 AM2017-08-25T05:28:23+5:302017-08-25T05:28:50+5:30
गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. या वेळी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- वैभव गायकर ।
पनवेल : गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. या वेळी वाहतूककोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अवजड वाहनांना मार्गावर पूर्णपणे बंदी असून शेकडो पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
पंधरा दिवसांपूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावर बंदोबस्ताला सुरुवात करण्यात आली होती. पनवेल शहरातून जाणाºया या मार्गावर सध्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाशी ते खारपाडा या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ३४ अधिकारी, ३३० वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच अपघात झाल्यास वाहतूककोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ वर एकूण १७ क्रेन ठेवण्यात आल्या आहेत. अपघातग्रस्तांना त्वरित मदत मिळावी याकरिता १० रु ग्णवाहिका या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. प्रवासी तसेच वाहनचालकांच्या मदतीसाठी चार मदतकेंद्रे उभारण्यात आली आहेत. कळंबोली चौकी, पळस्पे वाहतूक शाखा, कर्नाळा खिंड, खारपाडा (तारा) या ठिकाणी ही चार मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
लहान वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे.
६०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यापूर्वीच १४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून इतर ६०२ गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. यामुळे समाजकंटकांच्या गैरकृत्याला आळा बसून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा विश्वास आहे. शहरात श्रीगणेशाचे आगमन होऊ लागले असून पुढील दहा दिवस हा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिसांनी कंबर कसली आहे. परिमंडळ एकमध्ये २४ पोलीस निरीक्षक, ११४ सहायक निरीक्षक, ८२६ पुरु ष व १४१ महिला कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आल्याचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी सांगितले. याशिवाय सशस्त्र पोलिसांमार्फत गस्त घातली जाणार आहे. परिमंडळ एकमध्ये ३५५ सार्वजनिक गणपती मंडळे, १३४ रहिवासी सोसायटीमध्ये तर ३१,९९८ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. पहिल्या दिवसापासूनच २६ विसर्जन स्थळांवर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
नवी मुंबई, पनवेलमध्ये
४७६ सार्वजनिक गणपती
पनवेल, उरण व नवी मुंबईमध्ये ४७६ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय ५० हजारपेक्षा जास्त घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. नवी मुंबई महापालिकेने गणेश उत्सवासाठी जय्यत तयारी केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मुख्य चौकांमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. शहरात २३ विसर्जनस्थळांवर आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. ७२४ स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यस्था कायम राहावी यासाठी शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस व महापालिकेच्या वतीने गणेश उत्सव शांततेमध्ये व उत्साहामध्ये साजरा व्हावा, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
चालकांसाठी नवी मुंबई पोलिसांची हेल्पलाइन
नवी मुंबईमधून प्रवास करणाºया चालकांसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने ७७३८३९३८३९ हा टोल फ्री क्र मांक सुरू करण्यात आलेला आहे. वाहतुकीसंदर्भात येणाºया अडचणी, शंका यासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
२४ तास चार मदत केंदे्र
चालकांना मार्गातील बदल, सूचना तसेच येणाºया अडचणी सोडवण्यासाठी कळंबोली ते खारपाडा दरम्यान चार मदत केंद्रे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. कळंबोली, पळस्पे, कर्नाळा खिंड, तसेच खारपाडा (तारा) या ठिकाणी ही चार मदत केंद्रे सुरू आहेत.
क्रेन, रुग्णवाहिकेची सोय
महामार्गावर वाहनांची वर्दळ पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या मार्गावर १७ क्रे न व १० रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात क्रे न व रुग्णवाहिका ठेवण्यात आलेल्या आहेत.
पोलिसांचे आवाहन
कोकणात जाणाºया गणेशभक्तांनी जास्तीत जास्त मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करावा व टोल फ्री पासेस वाहतूक शाखेच्या कार्यालयातून घेऊन जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या मार्फत करण्यात आलेले आहे.
अवजड वाहनांना प्रवेश बंद
पनवेल ते सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६६वर पनवेल, सिंधुदुर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ आदी ठिकाणी होणारी वाळू, रेती तसेच भरलेले ट्रक दि. २३ ते दि. २५ आॅगस्टपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. तसेच १६ टन व त्यापेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर दि. ३१ आॅगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. चालकांच्या मदतीसाठी या मार्गावर चार मदत केंद्रे उभारली आहेत. त्यामध्ये एक एक अधिकारी तैनात केला आहे. आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सक्षम यंत्रणा मार्गावर उभारली असून चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रवास करावा. आवश्यकता भासल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
- नितीन पवार,
पोलीस उपायुक्त,
परिमंडळ-२