- लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिकेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी विविध पक्षांची दिग्गज नेते मंडळी पनवेलमध्ये तळ ठोकून आहेत, तर शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. असे असले तरी खरी चुरस भाजपा आणि महाआघाडीत असणार आहे. पनवेल ही जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. त्यामुळे या महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. शेकापने काँग्रेस व राष्ट्रवादीची मोट बांधून महाआघाडीचा पर्याय उभा केला आहे. तर राज्यात मित्र पक्ष असलेला आरपीआय (आठवले) आणि स्वाभिमानी पक्षाला सोबत भाजपा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. शिवसेनेने मुंबईच्या धर्तीवर येथेही स्वबळाचा नारा देत प्रचाराचा धडाका लावला आहे. असे असले तरी खरी चुरस महाआघाडी आणि भाजपामध्ये दिसून येत आहे.स्थानिक पक्ष म्हणून जिल्ह्यात शेकापची ओळख आहे. त्यामुळे या पक्षाचे ग्रामीण भागात बऱ्यापैकी वर्चस्व आहे. तर शहरी भागात भाजपाची ताकद वाढली आहे. माजी आमदार विवेक पाटील हे महाआघाडीचे मुख्य सूत्रधार आहेत, किंबहुना शेकापचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून शेकापचे किंबहुना विवेक पाटील यांचे भवितव्य अधोरेखित होणार आहे. महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीला पनवेलमध्ये ठोस नेतृत्व नाही. त्यामुळे त्यांची संपूर्ण भिस्त शेकापच्या प्रचार यंत्रणेवर आहे. महाआघाडीच्या वतीने आतापर्यंत नेते गणेश नाईक, दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींनी प्रचारात सहभाग घेतला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भाजपाची संपूर्ण मदार आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यानुसार त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छबीचा खुबीने वापर केला जात आहे. हायटेक प्रचार ही भाजपाची जमेची बाजू ठरली आहे. पनवेलमध्ये शिवसेनेला ठोस नेतृत्व नसल्याने पक्षाची पंचाईत झाली आहे. सेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांच्यावर येथील प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे. असे असले तरी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे येथे तळ ठोकून आहेत. गुरुवारी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पनवेलमध्ये बाइक रॅली काढून मतदारांना साद घातली.- नितीन सरदेसाई यांच्यावर मनसेच्या प्रचाराची धुरा सोपविण्यात आली आहे, तर उमेदवारांनी प्रचार सभेसाठी राज ठाकरे यांना साकडे घातले आहे. शेवटच्या टप्प्यात दिग्गजांच्या सभा२४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभा रंगणार आहेत. - महाआघाडीने सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यापैकी प्रमुख घटक पक्ष असलेल्या शेकाप ५८ तर काँग्रेस १२ जागा लढवित आहे. - राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपाने आपले मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी पक्षाला ७ तर आरपीआयला (आठवले) २ जागा दिल्या आहेत.
महाआघाडीची लागणार कसोटी
By admin | Published: May 19, 2017 4:22 AM