तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, ५० वर्षांपर्यंतचे ७२.६ टक्के रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 01:09 AM2020-10-01T01:09:47+5:302020-10-01T01:10:10+5:30
५० वर्षांपर्यंतचे ७२.६ टक्के रुग्ण : नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
नामदेव मोरे।
नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तरुणांनाच सर्वाधिक कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकूण रुग्णांपैकी ७२.६ टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपर्यंत आहे. २० ते ४० या वयोगटातील रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्युदर सर्वाधिक असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या ३६ हजारपेक्षा जास्त झाली आहे. प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या नागरिकांना असल्याचे आतापर्यंत बोलले जात होते. ज्येष्ठांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात येत होते. ज्येष्ठ नागरिकांनीही या आवाहनाला प्रतिसाद देऊन कामाशिवाय घराबाहेर पडणे बंद केले. नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोना होण्याची संख्या कमी होत आहे. शहरातील एकूण रुग्णांमध्ये ६० वर्षांच्या वरील वयोगटातील फक्त ११ टक्के रुग्ण आहेत. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांची संख्याही २७.४ टक्के आहे. उर्वरित ७२.६ टक्के रुग्ण हे ० ते ५० वर्ष वयोगटातील आहेत. यामध्येही २० ते ४० या वयोगटातील प्रमाण ४१ टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. दहा वर्षापर्यंतच्या मुलांचे ४.५६ व १० ते २० वर्ष वयोगटातील रुग्णांची टक्केवारी ७.५४ एवढी आहे.
तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने वाढत आहे. २० ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडावे लागत आहे. यामुळे त्यांचा इतरांशी संपर्क जास्त येत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाची सर्वाधिक लागण होत
आहे.
तरुणाईचा निष्काळजीपणा : कोरोनाची लागण तरुणांना जास्त प्रमाणात होते आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त तरुणांना घराबाहेर पडावे लागत असले तरी मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. बेफिकीर वृत्तीमुळे अनेकांना लागण होत असून नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
तीन हजार ज्येष्ठांची कोरोनावर मात : ज्येष्ठ नागरिकांनी सुरुवातीपासून कोरोनाच्या लढ्यात शासन व प्रशासनास सहकार्य केले आहे. आतापर्यंत ६१ ते १०० वयोगटातील ४,३२३ नागरिकांना कोरोना झाला आहे. यामधील तब्बल ३,२९६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. ९१ ते १०० वय असलेले तब्बल २७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
लहान मुलांची घ्यावी लागणार काळजी : शहरात लहान मुलांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत १० वर्ष वयोगटातील तब्बल १,६५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ११ ते २० वर्ष वयोगटातील २,७३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ० ते २० वर्षापर्यंतच्या सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. लहान मुले खेळण्यासाठी घराबोर पडू लागली आहेत. यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
नियमांचे होत नाही पालन
च्अनेक तरुण नियमांचे पालन करीत नाहीत. मास्क लावत नाहीत, तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्यामुळे तरुणाईला कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होत आहे. तरुणांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही
जास्त आहे. ५० वर्ष वयोगटापर्यंत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण जास्त
आहे.
च्या वयोगटातील जवळपास ९० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे व अनेकांना हृदयविकार, मधुमेह व
इतर सहव्याधी असल्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्युदर
जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस रु ग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढत आहे.
वयोगटाप्रमाणे रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
वयोगट एकूण रुग्ण कोरोनामुक्त मृत्यू शिल्लक रुग्ण
० ते १० १६५६ १५३८ १ ११७
११ ते २० २५३५ २५०० ५ २३०
२१ ते ३० ७२४० ६६१८ १७ ६०५
३१ ते ४० ७९७९ ७२५२ ४५ ६८२
४१ ते ५० ६७२४ ६०११ ९१ ६२२
५१ ते ६० ५६०० ४८०९ २०९ ५८२
६१ ते ७० २९०९ २२८० २०१ ४२०
७१ ते ८० १११३ ८०५ १२४ १८४
८१ ते ९० २७५ १८४ ५१ ४०
९१ ते १०० ३४ २७ २ ५