भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 07:21 AM2023-07-07T07:21:28+5:302023-07-07T07:21:47+5:30
मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.
नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच भाज्यांची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वाधिक होत असून, भावही तेजीत आहेत. होलसेल मार्केटमध्ये मिरची ६५ ते ८० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात आहे. राज्यातील इतर बाजारपेठांमध्येही दर वाढल्याने मिरची तिखट झाली आहे.
मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. आले, वाटाणा, फरसबी, टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. मिरचीची जूनमध्ये होलसेल मार्केटमध्ये २० ते ४४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. आता दर ६५ ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत. गुरुवारी मुंबई बाजार समितीमध्ये इतर भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वांत जास्त १६५ टन झाली. परंतु, मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्यामुळे दर तेजीत आहेत.
दोन आठवडे आवक कमीच राहणार
बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाला मुंबईत विक्रीसाठी येत आहे. दक्षिणेकडील राज्य, गुजरात व इतर राज्यांमध्येही उत्पादन कमी असल्यामुळे तेथील आवक बंद झाली आहे. पुढील दोन ते तीन आठवडे आवक कमीच राहील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.