ग्रीन कॉरिडोअर निरुपयोगी
By admin | Published: April 9, 2017 03:01 AM2017-04-09T03:01:18+5:302017-04-09T03:01:18+5:30
टोलनाक्याच्या रांगेत रुग्णवाहिकेची अडवणूक होऊ नये, यासाठी वाशी टोलनाक्यावर ग्रीन कॉरिडोअर सुरू करण्यात आले होते; परंतु अनेक दिवसांपासून ही यंत्रणा कोलमडली
नवी मुंबई : टोलनाक्याच्या रांगेत रुग्णवाहिकेची अडवणूक होऊ नये, यासाठी वाशी टोलनाक्यावर ग्रीन कॉरिडोअर सुरू करण्यात आले होते; परंतु अनेक दिवसांपासून ही यंत्रणा कोलमडली असल्याने रुग्णवाहिकांनाही टोलच्या रांगेतून जावे लागत आहे. याचा नाहक त्रास रुग्णांना होत असून टोल कर्मचाऱ्यांकडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
शिवसेना युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नाने वाशी टोलनाक्यावर ‘ग्रीन कॉरिडोअर’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात आली होती. ३० आॅगस्ट २०१५ रोजी या ग्रीन कॉरिडोअरचे मोठ्या थाटात उद्घाटनही करण्यात आले होते. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची टोलनाक्यावरील रांगेत अडवणूक होऊ नये, याकरिता हे ग्रीन कॉरिडोअर वापरण्यात येत होते. त्याकरिता टोलच्या दोन्ही दिशेला एका लेनवर विशेष यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. एखादी रुग्णवाहिका जात असल्यास तिला पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी कामगार तैनात करण्यात आले होते. सुरुवातीचे काही महिने ही यंत्रणा योग्यरीत्या राबवली गेली; परंतु सध्या ही यंत्रणा कोलमडली असून रुग्णवाहिकेसाठी ती निरुपयोगी ठरत आहे. ग्रीन कॉरिडोअरच्या ठिकाणी नेमलेले कर्मचारीच जागेवर उपस्थित नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध होत नाही. परिणामी, टोल भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगेतूनच रुग्णवाहिकेलाही जावे लागत आहे. याचा नाहक त्रास रुग्णाला व रुग्णासोबतच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. टोलनाक्याच्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप प्रदीप बुरकूल यांनी व्यक्त केला आहे. ग्रीन कॉरिडोअर ही संकल्पना योग्यरीत्या राबवली जाणे गरजेचे असतानाही, त्याकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यामुळे टोलच्या रांगेत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारास विलंब होऊन एखादा रुग्ण दगावल्यास त्याला टोल कंपनी जबाबदार असेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)